- नितीन ससाणे जुन्नर : शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरीवरील राजमाता जिजाबाई यांच्या पूजेतील गडदेवता शिवाई देवीच्या मूळ मूर्तीचे साधारणत: १९३० पूर्वीचे छायाचित्र उपलब्ध झाले आहे. यामुळे इतिहास संशोधकांसाठी मोलाचा ठेवा उपलब्ध झाला आहे. सध्या असलेली शिवाई देवीची मूर्ती व तांदळा १९३५ मध्ये नव्याने स्थापित करण्यात आलेला आहे. सन १९३२मध्ये गुप्तधनाच्या आमिषापोटी शिवाई देवीची मूळ शिवकालीन मूर्ती व तांदळ यांची हानी करण्यात आली होती. शिवाई देवीच्या मूर्तीचे सन १९३० पूर्वीचे कृष्णधवल छायाचित्र जुन्नरमधील ऐतिहासिक वस्तूंचे संग्राहक स्व. नारायण मते यांच्या संग्रहात होते. दुर्मिळ नाणी संग्राहक पृथ्वीराज मते यांनी हा फोटो उपलब्ध करून दिला. मुघलकालीन युद्धाच्या धामधुमीत शहाजीराजांनी १६२९मध्ये राजमाता जिजाऊंना बाळंतपणासाठी शिवनेरी किल्ल्यावर ठेवले होते. गडावरील शिवाई मातेवर जिजाऊंची विशेष श्रद्धा होती. शिवाई देवीवरील श्रद्धेपोटी छत्रपती शिवरायांचे नाव शिवाजी ठेवण्यात आले होते. प्रत्यक्षात राजमाता जिजाऊंच्या पूजेतील शिवाई मातेच्या मूर्तीचे मौल्यवान छायाचित्र उपलब्ध झाल्याने त्यास विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. १९३२मध्ये गुप्तधनाच्या आमिषापोटी शिवाई देवीच्या मूळ शिवकालीन मूर्ती व तांदळ्याची हानी करण्यात आल्याचे जुनेजाणते सांगत होते. मूळ मूर्तीचे छायाचित्र मिळाल्याने या गोष्टीला दुजोरा मिळत आहे. मुघलपूर्व काळात किल्ले शिवनेरी डोंगर कोळ्यांच्या ताब्यात असताना त्यांनीच गडदेवता देवी शिवाई देवीची प्रतिष्ठापना केली असावी, असे इतिहास अभ्यासक सांगतात. डोंगरकड्याच्या पाषाणात कोरण्यात आलेल्या मोठ्या दगडी घुमटामध्येच शिवाई देवीची मूर्ती व तांदळा स्थापन केलेला होता. आता मिळालेल्या छायाचित्रात शिवाई देवीची रंगकाम केलेली मूर्ती, तांदळा व कोनाडेवजा घुमटी स्पष्ट दिसत आहेत. मूळ मूर्ती व तांदळ्याला हानी पोहोचल्याने १९३५मध्ये नव्याने मूर्ती व तांदळा घडविण्यात आला. परंतु, अत्यंत कलाकुसरीने दगडी घुमटीचे रूपांतर आकर्षक चारखांबी नक्षीदार प्रभावळीत करण्यात आले. नवीन शिवाई देवीची मूर्तीदेखील आकर्षक करण्यात आली. तर, मूर्तीसमोरील तांदळा मोठ्या आकाराचा करण्यात आलेला आहे. (चौकट)नव्याने केलेली मूर्ती चतुर्भुज आहे. मूर्तीच्या पुढे नाक, कान, डोळे कोरलेली, शेंदूर लावलेली आत्मलिंगाप्रमाणे असलेली स्वयंभू मूर्ती आहे. तिला तांदळा संबोधले जाते. या मूर्तीला नंतर स्थानिक भक्तांनी तैलरंग दिलेला होता. ४ वर्षांपूर्वी शिवाई देवी मंदिराच्या संवर्धनाच्या वेळी पुरातत्त्व विभागाने प्रभावळीवरील तैलरंग काढून टाकून मूर्ती मूळ स्वरूपात आणली. देवीच्या मंदिरातील सुबक, कलापूर्ण, नक्षीदार लाकडी सभामंडपाचे काम नव्याने पेशवाईत करण्यात आलेले होते. तसेच, सभामंडप व परिसराची दुरुस्ती १९०७मध्ये मराठे मंडळी ट्रस्ट मुंबई या भाजी व्यापार करणाºया संस्थेन केल्याची नोंद आहे. अलीकडे या सभामंडपाची दुरुस्ती जुन्या धाटणीत पुरातत्त्व विभागाने सागवानी लाकडात केली आहे.
*** फोटो ओळ- (१) घुमटीतील शिवाई देवीची मूळ मूर्ती व छोटा तांदळा असलेल्या छायाचित्राची प्रत. (२) तैलरंग दिलेली मूर्ती व प्रभावळ. (३) सद्य:स्थितीत असलेली दगडी प्रभावळीतील शिवाई देवीची मूर्ती व मोठा तांदळा..