कळस - इंदापूर तालुक्यातील वनक्षेत्रातील अनेक दुर्मिळ पक्षी आपल्याला पाहायला मिळतात. दुष्काळामुळे झाडे कमी असल्याने जंगलातले प्राणी कमी होत आहेत. त्यांना अन्न मिळत नाही. या पक्ष्यांची गरज समजून त्यांचे संवर्धन करायला हवे; पण निसगार्पुढे पक्ष्यांचेही काही चालत नाही. मात्र शेळगाव कडबनवाडी येथील वनक्षेत्रात दुर्मिळ असा सर्पगरुड आजही निवास करीत आहे.कडबनवाडी परिसरात गेली काही वर्षांपासून चिंकारा लोक अभयवन असलेल्या वनक्षेत्रात पाच ते सहा सर्पगरुड नेहमी पाहायला मिळतात. गरुड हा पक्ष्यांचा राजा. सिंह जसा वनराज म्हणून ओळखला जातो त्याचप्रमाणे गरुड पक्षीराज म्हणून ओळखला जातो.सर्व पक्ष्यांत त्याचा वेगळाच दिमाख असतो. त्याचे गरुडभरारी पंख, त्याची बिल्लीसारखी नखे आणि त्याची कोयत्यासारखी चोच ही त्याची इतर पक्ष्यांपेक्षा वेगळी असणारी वैशिष्ट्ये आहेत. सर्व पक्ष्यांना त्याचा धाक आणि दरारा मोठा असतो. सिंह जसा गुहेतून बाहेर पळताना त्याची चाहूल सर्व पशूंना होते, त्याचप्रमाणे उंच पर्वताच्या कड्यावरून गरुड येतोय हे कळल्याबरोबर सारी लहानसहान पाखरे चिडीचूप होतात. गरुडाची भरारी खूप मोठी असते. गरुडाचे दोन प्रकार आहेत.एक सर्पगरुड, दुसरा मच्छीगरुड. एकाला सर्पाची शिकार आवडते तर दुसऱ्याला मासे फार आवडतात. गरुडाचे डोळे फार तीक्ष्ण असतात. तो कितीही उंचीवर आकाशात उडत असला तरी त्याला जमिनीवर सापाची वळवळ लगेच दिसते.गरुड हा उंच जागेवर राहतो. निसर्गात त्याचं आणि सापाचं वैर आहे. त्यामुळे तो नेहमी सर्पाच्याच शोधात असतो. त्याला सर्पाचे मांस फार आवडते तसेच ससे व उंदीरही त्याचे खाद्य आहे, अशी माहिती हिवरे बाजार येथील पक्षी विषयावरील लेखक सुरेशचंद्र वारघडे यांनी दिली.भारतीय पुराणात वा साहित्यात गरुडाचा उल्लेख आहे तो विष्णूचा वाहक म्हणजे विमान आहे असे म्हटले जाते. त्याचे घरटे म्हणजे त्याचा राजवाडाच असतो. गरुड शक्यतो उंच वृक्षावर घरटे बांधतो. झाडाच्या फांद्या ज्या ठिकाणी मचाणासारख्या पसरल्या आहेत, अशा पसरट फांद्यांचा घरटे बांधण्यासाठी उपयोग करतो. त्याचे घरटे दाट फांद्या व पानांनी झाकलेले असते. या ठिकाणी दोन जाग्यावर त्यांनी घरटी तयार केली आहेत. पाच ते सहा सर्पगरुड नेहमी पाहायला मिळतात.- प्रा. भजनदास पवारवन्यअभ्यासक, कडबनवाडी
वनक्षेत्रात दुर्मिळ सर्पगरुडाचा निवास
By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2019 12:29 AM