पुणे : केडगाव चाैफुला येथील बावीस फाटा या गावात एका गावकऱ्याच्या शेतात वाघाडी जातीच्या प्राण्याचे बछडे आढळून आले. गावकऱ्यांनी तातडीने याबाबत वन्यजीव संरक्षकांना संपर्क करुन त्या बछड्याला सुखरुप त्याच्या आईकडे साेडले.
मिळालेल्या माहितीनुसार केडगाव चाैफुला येथील शिंदे नामक गावकऱ्याच्या शेतात बिबट्या सारखा दिसणाऱ्या एका प्राण्याचे बछडे बुधवारी रात्री आढळून आले. शिंदे यांनी तातडीने वन्यजीव संरक्षक गाैरव गाडे यांना याबाबत माहिती तिली. गाडे हे त्यांच्या सहकाऱ्यांसाेबत घटनास्थळी हजर झाले. चाैफुला गावाच्या जवळच एके ठिकाणी आठवड्यापूर्वी बिबट्याने एका बकरीची शिकार केली हाेती. तसेच एका व्यक्तीवर हल्ला देखील केला हाेता. त्यामुळे आजूबाजूच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण हाेते.
गाडे यांच्या टीमने घटनास्थळी पाहणी केली असता बछडा हा बिबट्याचा नसून दुर्मिळ अशा वाघाटी जातीच्या प्राण्याचा असल्याचे समाेर आले. एक ते दीड महिन्याचे ते बछडे हाेते. मांजरी सारखा दिसणारा हा प्राणी रात्रीच्यावेळी शिकारीसाठी बाहेर पडत असताे. गाडे यांच्या टीमने संपूर्ण परिसराची पाहणी केली असता मादी वाघाडी त्या परिसरात बछड्याचा शाेध घेताना दिसली. त्यामुळे गाडे यांच्या टीमने बछडे मादीजवळ साेडले. त्यानंतर गावकऱ्यांना बिबट्या आणि मानवी संघर्षाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.