पुणे : अतिशय दुर्मीळ असणाऱ्या कर्वेनगर येथील वरुण वृक्षावर बांडगूळ आले होते. त्यामुळे तो वृक्ष जळून जात होता. परंतु, पर्यावरण अभ्यासकांनी वेळीच त्या झाडावरील बांडगूळ काढून टाकले आणि जळून जाणारा वरुण वृक्षाला संजीवनी मिळाली. जीवदान मिळाले. आता हा वृक्ष चांगलाच फुलला असून, कर्वेनगरमधील रस्त्याच्या कडेला दिमाखात उभा आहे.
पुणे शहरात कर्वेनगर परिसरात तीन वरुणाची झाडे होती. त्यातील एक झाड लोकांनी जाळून टाकले आणि दोन झाडे शिल्लक होती. त्या दोन झाडांवर बांडगुळे आल्याने ती देखील जळून जात होती. पण डिसेंबर २०२० मध्ये वनस्पती अभ्यासक श्रीकांत इंगळहळीकर आणि पर्यावरणप्रेमी लोकेश बापट यांनी या दाेन्ही झाडांवरील बांडगुळे काढली. त्यानंतर महिनाभरातच दोन्ही वरुण वृक्ष पुन्हा फुलले आहेत. खरे तर भारतात सर्वत्र आढळणारा हा वृक्ष आहे, पण अनेकजणांनी हा वृक्ष पाहिला नसणार, कारण हा दुर्मीळ आहे. जंगलात हा अगदी तुरळक दिसतो. पूर्वी धार्मिक वृक्ष म्हणून शंकराच्या देवळाजवळ लावला जात असे. त्यामुळे याला महत्त्व आहे. हा फुलल्यानंतर खूप सुंदर फुले बहरतात. त्यातून पुंकेसर बाहेर येतात. हा काळ त्याच्या बहराचा आहे.
----------------
फुलोरा अतिशय देखणा दिसतो
या वृक्षाचा फुलोरा अतिशय देखणा दिसतो. पाकळ्या गळून गेल्यानंतर मागे पुष्पकोष राहतो, तो देखील मनमोहक असतो. हिवाळ्यात पानगळ होते आणि नवी पालवी फुटते. पाने त्रिदलीय आणि बेलासारखीच दिसतात. पण बेलाप्रमाणे या वृक्षाला काटे नसतात.
----------------
नागरिकांनी आपआपल्या परिसरातील वृक्षांचे संगोपन करायला हवे. हा वृक्ष जसा वाचला, तसेच इतर वृक्ष कोणत्याही कारणाने मरत असतील, तर त्यांना वाचवले पाहिजे. तरच शहरातील वनराई टिकू शकेल.
- श्रीकांत इंगळहळीकर, वनस्पती अभ्यासक
-----------------