पुणे : मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना कधीच गाणं म्हणणे, चेहरा बदलणे आणि वाटेल ती विधाने करणे जमले नाही, अशा शब्दात विधान परिषदेच्या उपसभापती व शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी भाजपला सणसणीत टोला लगावला आहे.
पुण्यात नीलम गोऱ्हे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी राज्यातील विविध घडामोडींवर भाष्य केले. गोऱ्हे म्हणाल्या, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे कुटुंबावर जे काही जमीन व्यवहाराचे आरोप केले आहे. त्याबद्दल एका महिन्याच्या कालावधीत पुरावे सादर करावे अन्यथा त्यांनी जाहीर मागावी असे खुले आव्हान देखील सोमय्या यांना दिले आहे.
यावेळी गोऱ्हे यांनी भाजप नेते राम कदम यांचा देखील खरपूस शब्दात समाचार घेतला. त्या म्हणाल्या, कधीकाळी मुलींना उचलून आणण्यासारखी वक्तव्य करणारे नेतेच आता महिलांच्या सुरक्षेवर भाष्य करत आहे. हाच मोठा विनोद आहे. राज्य सरकार महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना कदापि पाठीशी घालणार नाही.
किरीट सोमय्यांबद्दलचे वायकरांचे 'ते' वक्तव्य अगदी खरे..
किरीट सोमय्या हे ठाकरे कुटुंबियांवर जे काही आरोप करत आहे. किंवा नवनवीन विषय उकरून काढत आहे ते जेवणाच्या ताटातील लोणच्यासारखे आहेत. त्यांच्या आजपर्यंतच्या आरोपावर नक्कीच एक पुस्तक तयार होईल. त्यांना ज्या मुद्द्यावर आक्षेप तो घेऊन सोमय्या यांनी न्यायालयात जावे. परंतु, किरीट सोमय्या हे पाणचट आहेत, हे रवींद्र वायकर यांचे वक्तव्य मला अगदी खरे वाटते आहे.
नारायण राणे हे वैफल्यग्रस्त... नारायण राणे हे वैफल्यग्रस्त झाले आहे. ते दुःखी आत्मा आहेत. त्यांची अवस्था विक्रम-वेताळसारखी झाली आहे. त्यामुळे तोंडी येईल ती बडबड राणे करत आहे, अशा शब्दात गोऱ्हे यांनी दिवाळीनंतर महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस नक्कीच होणार असून ठाकरे सरकार कोसळेल या वक्तव्यावर टीकेची झोड उठवली.