"भाजपने मित्रपक्ष फोडले..." BJP वर टीका, पुण्यात महादेव जानकरांची मोठी घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2023 08:37 PM2023-08-29T20:37:31+5:302023-08-29T20:38:45+5:30
स्वतःचे घर मजबूत करा अन् रासपचं सरकार आणा, असा सल्ला देखील त्यांनी कार्यकर्त्यांना दिला...
पुणे : राज्यात आज भाजपने मित्रपक्ष फोडले. पण काँग्रेस सत्तेवर होती तेव्हा त्यांनी पण छोट्या पक्षांना खाण्याचच काम केलं. ज्यांना आम्ही सत्तेत बसवलं त्यांना खाली खेचायची ताकद देखील आमच्यात आहे, असे म्हणत राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांनी आगामी लोकसभा निवडणुका स्वबळावर लढण्याचा नारा दिला.
तसेच स्वतःचे घर मजबूत करा अन् रासपचं सरकार आणा, असा सल्ला देखील त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने काढण्यात आलेल्या जनसुराज्य यात्रेच्या पहिल्या टप्प्याचा समारोप आज पुण्यात झाला. त्यानंतर राष्ट्रीय समाज पक्षाचा 20 वा वर्धापन दिन गणेश कला क्रीडा मंच येथे साजरा करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना माहादेव जानकर बोलत होते.
पुढे बोलताना महादेव जानकर म्हणाले, या क्षणाला राष्ट्रीय समाज पक्ष मोठा कसा करायचा आणि रासपची दिल्ली आणि राज्यात शासन कसं येईल, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. वीस वर्षाच्या कार्यकाळात रासापने 4 आमदार, 95 जिल्हा परिषद सदस्य, बेंगलोर, आसाम गुजरातमध्ये आम्ही लोकप्रतिनिधी निवडून दिले आहेत. टप्पा टप्प्याने आमची प्रगती चालू आहे. त्यामुळे आम्हाला कोणावर अवलंबून राहण्याची गरज नाहीये. आगामी लोकसभा निवडणुकीच्या देशातील 543 जागा आम्ही स्वबळावर लढणार आहोत, याचा पुनरुच्चार केला. तसेच मिर्झापूर (उत्तर प्रदेश), परभणी, माढा, बारामती यापैकी एका ठिकाणाहून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक असल्याचे सांगितले.