पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या विचारांतून आधुनिक राष्ट्रवादाची कल्पना मांडली होती. मात्र, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) समता, स्वातंत्र्य आणि बंधुता नसलेला राष्ट्रवाद आणत आहेत. आता आंबेडकरांना स्वीकारत असले, तरी त्यांचे विचार खूप विरोधाभासी आहेत, असे मत ज्येष्ठ विचारवंत व चौदाव्या विद्रोही सांस्कृतिक साहित्य संमेलनाचे अध्यक्ष राम पुनियानी यांनी येथे व्यक्त केले. विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या वतीने आयोजित विद्रोही सांस्कृतिक साहित्य संमेलनाचे उद्घाटन शनिवारी आमदार कपिल पाटील यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी चळवळीचे अध्यक्ष पार्थ पोळके, विठ्ठल सातव, सुरेश देशमुख आदी उपस्थित होते. ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य व ज्येष्ठ विचारवंत सय्यदभाई यांना या वेळी सिंधुजन पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पुनियानी म्हणाले, अनादी काळापासून हिंदू राष्ट्र असल्याची मांडणी आरएसएसकडून केली जाते. पण, प्रत्यक्षात मागील ३०० ते ४०० वर्षांपासून राष्ट्रवाद ही कल्पना अस्तित्वात आली आहे. राष्ट्रवादाचा ठेका घेतलेले स्वातंत्र्य चळवळीत मैदानात नव्हते. ते आपल्या शाखांमध्ये बसले होते. सध्या हिंदू राष्ट्रवादाचे राजकारण हे आव्हान आहे. नरेंद्र मोदींचे सरकार आरएसएसच्या अजेंड्यावर चालते. दोन वर्षांपासून सामाजिक परिवर्तनावर आक्रमण सुरू झाले आहे. परिवर्तनाला हिंदू राष्ट्रवाद हा मोठा धोका आहे. हे रोखून लोकशाही मजबूत करण्यासाठी सामाजिक आंदोलनांना मजबूत करण्याची गरज आहे. (प्रतिनिधी)
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आंबेडकरविरोधीच
By admin | Published: May 22, 2016 12:29 AM