पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या समर्थ भारत योजनेतंर्गत महापालिका, जनकल्याण समिती विवेक व्यासपीठ यांच्या वतीने कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या कर्वेनगर येथील बाया कर्वे वस्तीगृहात गुढीपाडव्यापासून कोरोना केअर सेंटर सुरु करण्यात आले.
यात ४५० खाटांची व्यवस्था आहे. पी.पी.सी.आर (पुणे प्लँटफॉर्म फॉर कोविड रिस्पॉन्स) सह्याद्री हॉस्पिटल, लोहिया परिवाराचे मुकुंद भवन ट्रस्ट, लक्ष्मीनारायण देवस्थान ट्रस्ट, परिमल आणि प्रमोद चौधरी फाउंडेशन, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था यांनी या सेंटरसाठी सहकार्य केले आहे.
संघाचे पुणे महानगर कार्यवाह महेश करपे यांनी दिली. एका खोलीत तीन रुग्णांची व्यवस्था असेल. कोणतीही लक्षणे नसलेली पण कोरोना अहवाल पॉझीटीव्ह असलेले रुग्ण ज्यांना विलगीकरण आवश्यक आहे आणि घरात सुविधा नाही अशा रुग्णांसाठी हे सेंटर आहे. सकाळचा चहा, नाष्टा, दोन्ही वेळचे जेवण, औषधे, प्राणायाम याची विनामूल्य व्यवस्था आहे. ८ डॉक्टर्स, २५ प्रशिक्षित कार्यकर्ते कायम उपस्थित असतील. वैद्यकीय सल्ल्यानुसार रुग्णास १० ते १२ दिवस सेंटरमध्ये राहता येईल.
आवश्यकता भासल्यास महापालिकेच्या साह्याने रुग्णाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचेही नियोजन आहे. सह्याद्री हॉस्पिटलच्या डॉक्टरांची टीम रुग्णांच्या तब्येतीची काळजी घेण्यास सज्ज असेल. समुपदेशनाची गरज असेल तर ते करण्याची सोय आहे. पी.पी.सी.आरचे मुख्य समन्वयक सुधीर मेहता, जनकल्याण समितीचे कार्यवाह तुकाराम नाईक, मुकुंद भवन ट्रस्टचे पुरुषोत्तम लोहिया,परिमल आणि प्रमोद चौधरी फाउंडेशनचे मुकुल कुलकर्णी, श्रीमती अर्चना तांबे-पाटील, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष रवी देव यावेळी उपस्थित होते.