लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे महापालिकेच्या स्थायी समितीचे विद्यमान अध्यक्ष हेमंत रासने यांची समितीवरची नियुक्ती कायम ठेवण्याचा निर्णय भारतीय जनता पक्षाने घेतला आहे. यामुळे स्थायी समितीचे अध्यक्षपद तेवीस महिने भूषवण्याची संधी रासने यांना मिळणार आहे.
स्थायी समितीच्या आठ सदस्यांची मुदत संपल्याने मंगळवारी (दि. १६) नव्याने नियुक्ती करण्यात आली. मुदत संपलेल्यांमध्ये रासने यांचाही समावेश होता. आठ सदस्यांपैकी सहा सदस्य भाजपचे आहेत़
सन २०१७ मध्ये इतर पक्षातून भाजपात आलेल्या ‘नव्यां’ना पुढील एका वर्षासाठी स्थायी समिती सदस्यपद देऊन आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खूष करण्याचा प्रयत्न केला आहे़ भाजपचा महापालिकेतील मित्रपक्ष ‘आरपीआय’ला मात्र या नेमणुकांमध्ये संधी देण्यात आलेली नाही़ यामुळे उपमहापौर पदापाठोपाठ स्थायी समिती सदस्य पदांमध्येही ‘आरपीआय’च्या पदरी निराशा आली आहे़
फेरनिवडीमुळे स्थायी समितीच्या अध्यक्षपदी सर्वाधिक काळ राहण्याची संधी रासने यांना मिळाली आहे. रासने यांचे अध्यक्षपददेखील कायम ठेवले जाणार असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे सुमारे २३ महिने स्थायी समिती अध्यक्ष म्हणून काम करण्याचा मान रासने यांना मिळेल. मार्च २०२० पासूनचे कोरोना आपत्तीचे वर्ष आणि गतवर्षी यापूर्वीच्या अध्यक्षांनी तयार केलेला अर्थसंकल्प सादर करणाऱ्या रासने यांना यंदा स्वत:च्या कारकिर्दीत तयार झालेला महापालिकेचा अर्थसंकल्प सादर करण्याची संधी मिळणार आहे़
चौकट
यांना ‘स्थायी’वर संधी
रासने यांच्याव्यतिरिक्त भाजपाने राहुल भंडारे, मनीषा कदम, महेश वाबळे, राजाभाऊ लायगुडे, अर्चना पाटील या पाच जणांना स्थायी समितीवर संधी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सुनील ऊर्फ बंडू गायकवाड आणि प्रदीप गायकवाड यांना स्थायी समितीवर पाठवण्यात आले आहे.