बारामती : राज्याचे दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी अजित पवार यांच्यासंदर्भात केलेल्या वक्तव्याचे पडसाद संपूर्ण पुणे जिल्ह्यातही उमटले. बारामतीसह दौंड, जेजुरी, सासवड, भोर, मुळशी अशा सर्व ठिकाणी निषेध मोर्चे, प्रतिकात्मक पुतळ््याचे दहन करून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा निषेध व्यक्त केला. बारामतीमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाच्या पदाधिकाऱ्याची गाडी फोडण्याचा प्रकारही घडला. राष्ट्रीय समाज पक्षाचे बारामतीतील कोषाध्यक्ष किशोर मासाळ यांच्या गाडीचे मध्यरात्री नुकसान केले, अशी तक्रार मासाळ यांच्यासह जिल्हाध्यक्ष संदीप चोपडे आणि इतर पदाधिकाऱ्यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात निवेदनाद्वारे दिली. घोषणाबाजी करीत आलेल्या जमावाने दगडफेक करून गाडीचे (एमएच ४२ / अेएच २११२) नुकसान केले, अशी तक्रार ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या निवेदनात आहे. या प्रकरणी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी संदीप चोपडे, माणिक काळे, अॅड. अमर सातकर, सारिका आगवणे, डॉ. नवनाथ मलगुंडे आदींनी केली. (प्रतिनिधी)
रासप पदाधिकाऱ्याच्या गाडीवर दगडफेक
By admin | Published: October 13, 2016 2:29 AM