भिगवण येथे २५-३० गावांना जोडणारी मुख्य बाजारपेठ असून याठिकाणी मोठी वर्दळ दैनंदिन असते. त्यामुळे येथील काेविड सेंटरमध्ये भिगवणसह इतर गावातील रुग्ण उपचार घेत असतात. परंतु, सध्या या ठिकाणी नवीन रुग्णांवर उपचार करणे बंद केलेले आहे. तसेच याठिकाणी जे रुग्ण उपचार घेत आहेत त्यांनाही इंदापूर, बारामती येथील कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल होण्याचा सल्ला दिला जात आहे. यामुळे रुग्ण व नातेवाईक यांची हेळसांड होत आहे. या सेंटरमधील डॉक्टर व नर्स यांचा असणारा स्टाफ कमी करण्यात आला असून सध्या येथे फक्त ३ डॉक्टर व २ नर्स रुग्णांवर उपचार करत आहेत. त्यामुळे भिगवण ग्रामपंचायतीचे सरपंच तानाजी वायसे, संजय देहाडे, पराग जाधव यांनी भिगवण येथील काेविड सेंटर पूर्ववत पूर्ण क्षमतेने सुरू करण्याची मागणी तहसीलदारांकडे केली होती. परंतु दिलेल्या मुदतीत हे सेंटर पूर्ववत सुरू न केल्यामुळे या ठिकाणी सोमवारी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. या वेळी अशोक शिंदे यांनी आरोग्य प्रशासनाचा जाहीर निषेध व्यक्त केला. या वेळी उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी कोविड सेंटर पूर्णक्षमतेने सुरू न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला.
आंदोलनाला विरोधकांची दांडी
ग्रामपंचायतीने सर्व ग्रामस्थांच्या सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलन यशस्वीरित्या पार पाडले. परंतु यासाठी विरोधकांनी मात्र दांडी मारल्याचे चित्र पहावयास मिळाले. तर आरोग्यदूत म्हणून ओळख सांगणारे कार्यकर्ते याठिकाणी दिसून आले नसल्यामुळे विरोधकांना काेविड सेंटर सुरू करण्याबाबत काही देणेघेणे नाही का? अशी चर्चा परिसरामध्ये रंगली होती.
२६ भिगवण