दरवर्षीच फेब्रुवारी महिन्यापासून रसवंती व्यवसाय सुरू होतात. यानंतर मार्च, एप्रिल, मे आणि जूनमध्ये लाखो रुपयांची उलाढाल या माध्यमातून होत असते. रसवंती व्यवसायातून रसवंती मालक, काम करणारे मजूर, तसेच प्रामुख्याने ऊस उत्पादक शेतकरी यांना मोठा फायदा होतो.
मागील वर्षीचा व चालू वर्षीचीही रसवंतीगृहाचा हंगाम कोरोना संकटामुळे वाया गेला. यावर्षी फेब्रुवारी महिन्यातच उन्हाचा चटका जाणवत होता. मात्र नागरिकांनी उसाचा रस खरेदी करण्याकडे पाठ फिरवली. कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर थंड पदार्थ टाळावे, अशी खबरदारी सूचविण्यात आल्यानंतर नागरिकांनी उसाचा रस तसेच इतर शीतपेयांकडे पाठ फिरवली.
यावर्षीही ऐन उन्हाळ्यामध्येच कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत राहिल्याने, राज्य सरकारकडून लाॅकडाऊन जाहीर करण्यात आला. मागील वर्षांप्रमाणेच यावर्षीही लॉकडाऊन जाहीर झाल्याने रसवंती व्यवसाय बंद पडले.
रसवंतीगृहासाठी लागणारा ऊस उत्पादक शेतकरीवर्गालाही सलग दुस-या वर्षी मोठी आर्थिक झळ सोसावी लागली. रसवंती व्यवसायाला पूरक म्हणून अनेक शेतकरी दरवर्षी उसाचे उत्पादन घेतात. थोड्याफार प्रमाणात प्रत्येकजण उसाची लागवड करतात. त्यातील अनेक जण रसवंती व्यावसायिकांना ऊस विकून हजारो रुपयाचे उत्पन्न या माध्यमातून काही शेतकऱ्यांना होते. मागील वर्षीचा रसवंतीगृहाचा हंगाम वाया गेला असला तरी यावर्षीचा हंगाम तरी चांगला जाईल, असे अनेक ऊस उत्पादक शेतकरीवर्गाला वाटत होते. अनेक शेतक-यांनी रसवंतीगृहाचा ऊस मागील महिन्यापर्यंत शेतातच ठेवला होता. मात्र कोरोना संकट आणखीच गडद होत असल्याचे पाहून, तसेच शासनाकडून जाहीर केलेला लाॅकडाऊन संपला नसल्याने, मागील वर्षांपासून रसवंत्याच बंद पडल्याने शेतातील उसाला मागणी नसल्याने, अनेक शेतकऱ्यांनी शेतामधील ऊस जनावरांना चारला असल्याचे ऊस उत्पादक शेतकरी सतीश भुजबळ, अर्जुन दुर्गाडे यांनी सांगितले.
वाल्हे (ता. पुरंदर) परिसरामधील रसवंतीगृह व्यवसायिक महावीर भुजबळ, प्रकाश पवार, सागर जाधव, अर्जुन दुर्गाडे, विलास भुजबळ, सागर इंगळे, दत्तात्रय भुजबळ आदी रसवंतीगृह व्यावसायिकांवर आर्थिक संक्रात यांनी सांगितले.
वाल्हे (ता. पुरंदर) येथील रसवंतीगृह कोरोना संकटामुळे बंद ठेवण्यात आले आहेत.