एन.ए. अनपट भोसले : गृहनिर्माण संस्था मानीव अभिहस्तांतरणबाबत चर्चासत्राचे आयोजन
पुणे : पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये केवळ २ हजार ५०० संस्थांनी मानीव अभिहस्तांतरण केले आहे. म्हणजे केवळ १० टक्के संस्था नोंदणीकृत आहेत. पुण्यासारख्या शहरात देखील मानीव अभिहस्तांतरणाला अतिशय कमी प्रतिसाद आहे. केवळ १९००० सोसायट्या नोंदणीकृत आहेत. मोठ्या प्रमाणात मानीव अभिहस्तांतरण व्हावे यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने विशेष मोहीम राबवित आहे, या अंतर्गत पुणेकरांनी मानीव अभिहस्तांतरण करून घ्या, असे आवाहन सहकारी संस्थेचे सहायक निबंधक एन. ए. अनपट भोसले यांनी केले.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने गृहनिर्माण संस्थांना मालमत्तेचे मानीव अभिहस्तांतरण प्राप्त होण्याच्या दृष्टीने राज्यातील सर्व जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांच्यावतीने १ ते १५ जानेवारी दरम्यान विशेष मोहीम राबवित आहे. या विशेष मोहिमेअंतर्गत गृहनिर्माण संस्था यांचे मानीव अभिहस्तांतरण संदर्भात चर्चासत्राचे आयोजन नवी पेठेतील पत्रकार भवन येथे केले होते. यावेळी सहकारी संस्थेचे सहायक निबंधक एन. ए. अनपट भोसले, अॅड. अंजली कलंत्रे चर्चासत्रात सहभागी झाले होते. शिल्पा देशपांडे यांनी त्यांच्याशी संवाद साधला.