पुणे : शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरणाचे वेगवेगळे दर असल्याने नागरिकांकडून लूट होत असल्याची ओरड आहे. शासनाने ठरवून दिलेल्या रकमेपेक्षा अधिक रक्कम घेऊन लस दिली जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरणाचा एकच दर निश्चित करण्याची मागणी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी राज्य शासनाकडे केली आहे.
शासनाच्या मान्यतेनंतर मागील आठवड्यापासून काही खासगी रुग्णालयांमध्ये कोरोना प्रतिबंधक लस देण्यास सुरुवात झाली आहे. केंद्र, राज्य सरकार व खासगी संस्थांसाठी लसींचे वेगळे दर निश्चित करण्यात आले आहेत. खासगी रुग्णालयांना ६०० रुपये दराने कोव्हिशिल्ड लस उपलब्ध होत आहे. मात्र, लसीकरणासाठी रुग्णालये ९०० रुपयांपासून बाराशे रुपयांपर्यंत दर आकारत आहेत.
कोरोनावरील उपचार, स्वॅब चाचणीचे दर जसे निश्चित केले; त्यानुसार लस खरेदीची किंमत व लसीकरणाचे दर निश्चित करावेत, अशी मागणी मोहोळ यांनी केली आहे.
--///--
रुग्णसंख्या कमी होत असताना लाट ओसरत असल्याचे सकारात्मक चित्र दिसत आहे. राज्यात ३१ मेपर्यंत संचारबंदी आहे. १ जूनपासून काही प्रमाणात अनलॉक करण्याबाबत शासन स्तरावर हालचाली सुरू आहेत. दुसऱ्या लाटेचा अनुभव पाहाता शासनाने अनलॉक करण्यासाठी घाईगडबड करू नये व टप्प्याटप्प्याने प्राधान्यक्रम ठरवून अनलॉक करावे.
- मुरलीधर मोहोळ, महापौर
-----
स्थायी समितीकडून कारवाईचा प्रस्ताव
शासनाने निश्चित केलेल्या दरापेक्षा लसीकरणासाठी अधिक रक्कम आकारल्यास रुग्णालयांवर कायदेशीर कारवाई करावी असा ठराव स्थायी समितीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत मंजूर करण्यात आला. तसेच, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयासह काही खासगी रुग्णालये लसीकरणासाठी निधी संकलन करून गरिबांना मोफत लस पुरविणार आहेत. अशा प्रकारचे काम अन्य रुग्णालयांनी करावे असे ठरावात नमूद करण्यात आल्याचे स्थायीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी सांगितले.