लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात तिच्या आई-वडिलांनी नव्याने जबाब नोंदविला असून त्यात कोणाविरुद्ध त्यांची तक्रार नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास पोलिसांनी पूर्ण केल्याचा अहवाल अद्याप सादर केलेला नाही. त्यामुळे तपास बंद करण्यात आलेला नाही. याप्रकरणाचा तपास सुरू असून अद्याप कोणालाही निर्दोषत्त्व बहाल करण्यात आलेले नाही, असे परिमंडळ पाचच्या पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी सांगितले.
बीड जिल्ह्यातील पूजा चव्हाण या युवतीने वानवडीतील हेवन पार्क इमारतीतल्या सदनिकेतून उडी मारून आत्महत्या केली होती. ही घटना ७ फेब्रुवारीला घडली होती. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाशी तत्कालिन वनमंत्री संजय राठोड यांचे नाव जोडण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. “पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा तपास सुरू आहे. या प्रकरणाचा तपास बंद (क्लोजर रिपोर्ट) करण्यात आलेला नाही,” असे पोलिसांनी स्पष्ट केले.
पंधरा दिवसांपूर्वी वानवडी पोलिसांनी पूजाच्या पालकांचा नव्याने जबाब नोंदविला आहे. या जबाबात त्यांनी त्यांची कोणाविरोधात तक्रार नसल्याचे म्हटले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड यांच्या मार्गदर्शनाखाली याप्रकरणाचा तपास करण्यात येत आहे. पूजाच्या आत्महत्येनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली होती. भारतीय जनता पक्षाच्या चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेऊन याप्रकरणाची सखोल चौकशीची मागणी केली. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संजय राठोड यांना निर्दोषत्त्व बहाल केल्याचे काही माध्यमांमधून आलेले वृत्त निराधार असल्याचे पोलिसांनी सांगितले.