काटेवाडी : काटेवाडी येथे पालखी सोहळ्यातील पालखी रथाभोवती मेंढ्यांचे रिंगण पार पडले. या वेळी हजारो भाविकांनी हा सोहळा पाहण्यासाठी गर्दी केली होती. कविवर्य मोरोपंतांची कर्मभूमी बारामती मुक्कामानंतर श्री संत तुकाराममहाराज पालखी सोहळा शनिवारी (दि. १४) इंदापूर तालुक्यातील सणसर येथे मुक्कामासाठी दाखल झाला. तत्पूर्वी काटेवाडी येथे धोतराच्या पायघड्या अंथरून जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे उत्साही स्वागत करण्यात आले. दुपारी ३ वाजता संभाजी काळे, तात्यासो मासाळ, महादेव काळे, सुभाष मासाळ, हरी महारनवर, यांच्या मेंढ्यांनी पालखी रथाभोवती पाच प्रदक्षिणा घालून रिंगण पूर्ण केले. या वेळी उपस्थित भाविकांनी हरिनामाचा गजर केला. या वैशिष्टपूर्ण रिंगणाने भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. बारामती शहरातून शनिवारी पहाटे प्रस्थान ठेवल्यानंतर पिंपळी, लिमटेक येथील स्वागत सत्कार स्वीकारत काटेवाडीत विसावला. या वेळी पालखी रथातून दर्शन मंडपात पालखी नेण्यासाठी परिट समाज बांधवांच्या वतीने धोतराच्या पायघड्या घालण्यात आल्या. गावच्या वेशीतून बँडपथक, शालेय लेझीमपथक, हरिनामाच्या गजरात मोठ्या उत्साहात ग्रामस्थांनी पालखी खांद्यावरून दर्शन मंडपात नेण्यात आली. या पालखी सोहळ्याचे बारामती टेक्स्टाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार, प्रांताधिकारी हेमंत निकम, सरपंच विद्याधर काटे, आदींनी स्वागत केले. काटेवाडीच्या रिंगण सोहळ्यानंतर इंदापूर तालुक्यात भवानीनगर येथे पालखी सोहळ्याचा प्रवेश झाला.> पालखी सोहळा दर्शन मंडपात विसावल्यानंतर दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. काटेवाडी येथे पालखीच्या स्वागतासाठी पताका, स्वागत कमानी, लावून परिसराची सजावट केली होती. दर्शन मंडप सभागृह फुलांच्या माळांनी सजविले होते. पालखी सोहळा दुपारी विसावल्यानंतर वारकरी भाविकांनी गावात जेवणाचा आस्वाद घेतला. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या काटेवाडीच्या घरी वारकरी भाविकांनी जेवणाचा आस्वाद घेतला. दुपारच्या जेवणाच्या विसाव्यानंतर तीन वाजता रिंगण सोहळा पार पडला.
काटेवाडीत तुकोबांच्या रथाला मेंढ्यांचे रिंगण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2018 12:59 AM