खोडद : चालू वर्षीचा भयाण दुष्काळ आणि जमिनींमधील खालावलेली भूजल पातळी यामुळे शेतकरी हवालदिल होऊन शेतमालातून दोन पैसे मिळावेत म्हणून पाणी मिळवण्याच्या प्रयत्नात मोठ्या प्रमाणात बोअरवेल मारत आहेत. काही वर्षांपूर्वी अवघ्या ५० ते १०० फुटांवर लागणारे पाणी आता ३०० ते ६०० फुटांवरदेखील लागत नसल्याने भविष्यातील पाण्याचा दुष्टीने ही बाब गंभीर झाली असून, विहिरी किंवा बोअरवेलमधील पाणीपातळी वाढविण्यासाठी उपाययोजना करण्याचे आव्हान शेतकऱ्यांसमोर आहे.जुन्नर तालुक्यात भूगर्भातील पाणीपातळी मोठ्या प्रमाणात खालावत आहे. जमिनीतून पाणी मिळेल या आशेने शेतकरी दररोज ५० ते ७० ठिकाणी बोअरवेल खोदत आहेत, पण पाणी मिळण्याऐवजी ३०० ते ६०० फूट खोल बोअरवेलसाठी १८ हजार ते ३० हजार रुपये खर्च होत आहेत. पूर्वी ५० ते १०० फुटांवर असणारी पाणीपातळी आता प्रचंड खालावल्यामुळे विहिरींनी तळ गाठला आहे, त्यामुळे बारमाही विहिरी आठमाही झाल्या आहेत, यामुळे विहीर बागायत कमी होऊन बोअरचे प्रमाण वाढले आहे. यासाठी बिहार,आंध्र प्रदेश, तामिळनाडू या परराज्यांतील हायप्रेशर मशीनद्वारे तीन, चार तासांत बोअरवेल खोदले जातात. उन्हाळी हंगामामध्ये हा व्यवसाय तेजीत आहे. भूगर्भ विभागाच्या सूचनेनुसार २०० फुटांपेक्षा अधिक खोल बोअरसाठी परवानगी घ्यावी लागते पण या सूचनेकडे सर्रास दुर्लक्ष करून खोलवर बोअर घेतले जात आहेत. रोहयो मध्ये जुन्या नव्या बोअरवेल पुनर्भरणासाठी धडक कृती कार्यक्रम हाती घ्यावा लागेल, कारण राज्यात सर्व विभागातील पाणीपातळी ४ ते ७ मीटर घटल्याची नोंद आहे. शास्त्रीय पद्धतीने पावसाचे पाणी पुन्हा जमिनीत सोडणारी यंत्रणा उभी करावी लागेल. यातूनच दुष्काळ या समस्येवर कायमचा शाश्वत उपाय सापडू शकेल, असे कृषी तंत्र निकेतनचे प्राचार्य प्रा. राधाकृष्ण गायकवाड यांनी सांगितले.
बोअरवेल घेण्याचे प्रमाण वाढले : जुन्नर तालुक्यात ३०० ते ६०० फुटांपर्यंत चाचपणीचा प्रयत्न
By admin | Published: April 26, 2016 1:55 AM