लोकमत न्यूज नेटवर्कराजगुरुनगर : रेशनिंग दुकानात योग्य व पारदर्शक कारभार होण्यासाठी व धान्यवाटप प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचण्यासाठी खेड तालुक्यातील १८६ रेशनिंग दुकानदारांना बॉयोमेट्रिक मशीनचे वाटप करण्यात आले. यापुढे रेशनिंग दुकानदारांकडून होणाऱ्या धान्याच्या काळ्याबाजाराला आळा बसणार आहे.शासनाने खेड तालुक्यात प्रत्येक गावात बायोमेट्रिक मशीन पुरवण्याचे आदेश दिले होते. त्यांची अंमलबजावणी करून बायोमेट्रिक मशीन दुकानदारांना देण्यात आली आहेत. तालुक्यात ५९,०६८ कार्डधारक आहेत. रेशनिंग दुकानात योग्य व पारदर्शक कारभार होण्यासाठी व योग्य पद्धतीने धान्यवाटप होण्यासाठी नागरिकांचे ठसे घेतले जाणार आहेत. त्यामुळे दुकानधारकांना धान्याचा काळाबाजार यापुढे करता येणार नाही.दुकानदारांनी सामाजिक सेवक म्हणून काम करावे. तसेच बायोमेट्रिक मशीन आल्यामुळे सर्व कारभार पारदर्शक होणार आहे. त्यामुळे दुकांनदारांना यापुढे कुठले पुरावे दाखवावे लागणार नाहीत. यापूर्वी जो सर्वसामान्य नागरिकांना त्रास होत होता, तो आता होणार नाही, असे प्रांतधिकारी सुनील गाढे यांनी सांगितले.बायोमेट्रिक मशीनचे वाटप प्रांताधिकारी सुनील गाढे, तहसीलदार सुनील जोशी, नायब तहसीलदार बोडके, पुरवठा अधिकारी सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी रेशनिंग दुकानदारांना मशीन कसे वापरावे, याचे प्रशिक्षण देण्यात आले.शिरूर तालुका : अनुदानाअभावी वर्षभराच्या आतच योजना बारगळली?लोकमत न्यूज नेटवर्कशिरूर : रेशनिंग व्यवसायात पारदर्शकता येण्याच्या दृष्टिकोनातून आज तालुक्यातील १३८ रेशनिंग दुकानदारांना बायोमेट्रिक मशिनचे वापट करण्यात आले. पाच वर्षांपूर्वी माजी आमदार अॅड़ अशोक पवार यांच्या प्रयत्नातून तालुक्यातील पाच गावांतील दुकानांत बायोमेट्रिक यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली होती. मात्र, अनुदानाअभावी वर्षभराच्या आतच ती बारगळली.रेशनिंग दुकानदारांमध्ये धान्य वितरित करताना मोठ्या प्रमाणावर काळाबाजार होत असल्याच्या अनेक तक्रारी सातत्याने पुढे येत होत्या. पवार आमदार असताना त्यांनी पुढाकार घेऊन तालुक्यातील वडगाव रासाई, सादलगाव, तांदळी, कुरळी व चव्हाणवाडी या गावांत रेशनिंग दुकानात बायोमेट्रिक यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली होती. मात्र, शासनाचे अनुदान बंद झाल्याने ही यंत्रणा बंद पडली. याबाबत दुकानदारांनीही अनेक ग्रामस्थांच्या अंगठ्याचे इम्प्रेशन येत नसल्याने अडचणी निर्माण होत असल्याच्या तक्रारी केल्या होत्या. दरम्यान, तालुका बायोमेट्रिक व्हावा तसेच एकूणच राज्यात ही यंत्रणा राबवावी, अशी मागणी पवार यांनी विधानसभेत केली होती. मागील वर्षी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी जिल्हा बायोमेट्रीक करण्याचे सूतोवाच केले होते.प्रत्यक्षात आज तालुक्यात रेशनिंग बायोमेट्रिक यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. जिल्हा पुरवठा अधिकारी दिनेश भालेदार यांनी दुकानदारांना मशिनचे प्रात्यक्षिक करून दाखविले. रेशनिंग कार्डधारकांचे तसेच त्याचे कुटुंबातील एका व्यक्तीचे थंब इम्प्रेशन मशिनवर घेण्यात येणार असून, दोघांपैकी एकाला धान्य मिळणार आहे. एकूणच धान्य वितरणात पारदर्शकता येणार असल्याचे भालेदार यांनी सांगितले. १३८ पैकी १३३ दुकानदारांना आज मशिनचे वाटप करण्यात आले. निवासी नायब तहसीलदार शफीक शेख, नीलेश खोेडसकर, रेशनिंग दुकानदार संघटनेचे अध्यक्ष हनुमंत टोणगे, नगरसेविका संगीता मल्लाव, संघटनेचे माजी अध्यक्ष बाबा गंगावणे, बाजार समितीचे माजी उपसभापती सुनील तांबे उपस्थित होते.आंबेगाव तालुका : ७१ दुकानदारांना पीओएस मशिन वाटप लोकमत न्यूज नेटवर्कघोडेगाव : सार्वजनिक वितरण व्यवस्था परदर्शक व्हावी यासाठी जिल्हा पुरवठा विभागाने प्रत्येक दुकानदारांना पीओएस मशिन दिल्या आहेत. या बायोमॅटरीक मशिन आंबेगाव तालुक्यातील ७१ दुकानदारांना आज दि.२२ रोजी सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल कारंडे व तहसिलदार रविंद्र सबनिस यांच्या हस्ते मशिनचे वाटप करण्यात आले. यासाठी पुरवठा विभागाने तालुक्यातील सर्व दुकानदारांची कार्यशाळा घेतली. यामध्ये हि मशिन वापरण्या संदर्भात मार्गदर्शक सुचना देण्यात आल्या. तसेच हि मशिन वापरात येणा-या अडचणी दुकानदारांकडून समजून घेवून प्रत्येक प्रश्नाचे निरसन करण्यात आले. यावेळी दुकानदारांनीही प्रत्यक्ष प्रात्यक्षिक केले व माहिती करून घेतली. या मशिनमुळे धान्य वाटपात होणारा फेरफार थांबवणार असून एक क्लिकवर दुकानदारांचा सर्व हिशोब समजणार आहे. प्रत्येक दुकानराला हि मशिन वापरणे बंधनकरक करण्यात आले असून तात्काळ या मशिनचा वापर दुकानदारांनी सुरू करावा अशा सुचना यावेळी देण्यात आल्या.
रेशन धान्याचा काळाबाजार संपणार
By admin | Published: June 23, 2017 4:38 AM