नितीन चौधरी
पुणे : शिधापत्रिकेवरील धान्य तुम्हाला ठरलेल्या मापात मिळतेय, याची खात्री आहे का तुम्हाला? नसेलच. आता तुमच्यासाठी ठरलेल्या धान्याच्या कोट्याचा, तुम्ही किती धान्य घेतले याचा एसएमएस तुम्हाला मिळणार आहे. याबाबतची चाचपणी करण्यासाठी राज्य सरकारने सर्व जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. त्यामुळे रेशन दुकानदारांकडून होणाऱ्या मापात पापाचे वाटेकरी कोण, हे कळू शकणार आहे. परिणामी, ग्राहकांकडून होणाऱ्या तक्रारी कमी होतील, असा होरा सरकारी पातळीवर व्यक्त होत आहे.
शिधापत्रिकांना कुटुंबांतील सर्वच सदस्यांचे आधार जोडण्याचे काम सध्या सुरू आहे. राज्यभरात सर्वच जिल्ह्यांमध्ये हे काम प्रगतिपथावर असून बहुतांश जिल्ह्यांत ते ९५ टक्क्यांपुढे झाले आहे. शिधापत्रिकांना आधार जोडल्याने कुटुंबातील व्यक्तींची नेमकी संख्या कळून त्यांना त्यानुसार धान्य दिले जात आहे. महत्त्वाचे म्हणजे दुबार शिधापत्रिका असणाऱ्यांची नावे वगळण्यात आळी आहे. त्यामुळे धान्याची बचत होऊन सरकारला हे धान्य अन्य गरजूंना देता येत आहे.
याच धर्तीवर या शिधापत्रिकांना मोबाईल क्रमांक जोडण्याचे ठरविण्यात आले आहे. याबाबत ग्राहक पुरवठा विभागाच्या प्रधान सचिवांनी बुधवारी सर्व जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांची ऑनलाइन बैठक घेतली. त्यात हा निर्णय तातडीने लागू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
अशी मिळणार सुविधा
- कुटुंबातील एका सदस्याचा मोबाईल क्रमांक शिधापत्रिकेला जोडण्यात येणार आहे.- या क्रमांकावर त्या कुटुंबाच्या सदस्य संख्येनुसार देय असलेल्या धान्य कोट्याचा व धान्य खरेदी केल्याचा एसएमएस दिला जाईल.- हे धान्य तुम्हीच खरेदी केले की अन्य व्यक्तीने तुमच्या कोट्याचे धान्य उचलले हे कळू शकणार आहे. परिणामी, तुमचा रेशनदुकानदार तुमच्या कोट्याचे धान्य तुम्हालाच देतोय की अन्य कुणी त्यात वाटेकरी ठरतोय हे कळू शकेल.- दुकानदारांचे मापात पाप आहे का हे यानिमित्ताने उघड होण्यास मदत होईल. त्यामुळे ग्राहकांच्या तक्रारी कमी होतील.
ग्राहकांना येणार एसएमएस
मोबाईल क्रमांक जोडण्यासाठी एक स्वतंत्र व्यवस्था तयार करण्यात येत आहे. तसेच, ही सुविधा प्रत्येक रेशनदुकानदाराकडे द्यायची का, याबाबतही वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे. सध्या तालुकास्तरावर ही सुविधा उपलब्ध आहे. गावातील धान्य वितरण समितीला धान्याचा कोटा आल्याचा एसएमएस मिळतो. त्याच धर्तीवर सर्वच ग्राहकांना असा एसएमएस देता येणार आहे.