--
नीरा : पुरंदर तालुक्यातील मौजे पिंगोरी येथील स्वस्त धान्य दुकानदार वसंत गणपतराव शिंदे यांचा व्हेंटिलेटर बेड न मिळाल्याने मृत्यू झाला असल्याचाला आरोप तालुक्यातील सर्व रेशन दुकानदार यांनी केला आहे. या घटनेचा निषेध आणि बेड उपलब्धतेसाठी पुरंदरच्या पुरवठा विभागातील रेशन दुकानदारांनी धान्य वितरण करणार नाही अशी भूमिका घेतली आहे
रेशन दुकानदारांना विमा संरक्षण द्यावे, उपचारासाठी राखीव बेड द्यावेत तो पर्यंत धान्य वितरण करणार नससल्याचे पत्र शेंडकर, रणपिसे, जाधव, लेंडे आदी दुकानदारांनी दिले.
कोरोना महामारीमध्ये अनेक दुकानदारांना आपल्या जिवाला मुकावे लागले आहे. आजही पुरंदरच्या ग्रामीण भागातील बहुतांश रेशन दुकानदार कोरोनबाधित होत आहेत. प्रशासनाचा एक घटक म्हणून रेशन दुकानदार प्रामाणिक व पारदर्शकपणे आपले काम करीत आहे. परंतु त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. धान्य वाटप करताना त्याला अनेक नागरिकांच्या सहवासात यावे लागत आहे. धान्य घेण्यासाठी येणारे अनेक कार्डधारक कोरोनाबाधित असल्याचे निदर्शनास येत आहे. परंतु ते कार्डधारक राजरोसपणे धान्य वाटपाच्या रांगेत उभे राहून धान्य घेऊन जात असतात. रेशन कार्डधारकांचे अंगठे दुकानदारांना हात धरुन मशीन वर घ्यावे लागत असल्याने कोरोना संसर्गचा फैलाव वाढतच आहे.
कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी दुकानदारांच्या अंगठ्याने माल देणे गरजेचे आहे. पुरंदर तालुक्यामध्ये अनेक दुकानदार कोरोना बाधित सापडले आहेत त्यांना प्रशासनाने ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर बेड राखीव ठेऊन रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. इथून पुढे कोरोना पाॅझिटिव्ह असणाऱ्या दुकानदारांचे प्राण वाचवण्याचे काम लोकप्रतिनिधी व तालुका प्रशासनाने करावे अशी काही दुकानदारांनी तळमळीने विनंती केली आहे.