पुणे : ठेकेदार साखळी करून महापालिकेची कामे घेतात, या विषयावरून सुरू असलेल्या चर्चेत विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेस व सत्ताधारी भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक यांच्यात हमरीतुमरी झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव घेतल्यावरून भाजपाचे सदस्य संतापले तर हरकत घेता व बोलू देत नाही म्हणून राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी भाजपाला धारेवरधरले.ठेकेदारांच्या साखळी पद्धतीवर बोलत असताना राष्ट्रवादीचे सुभाष जगताप म्हणाले, की पारदर्शक कारभाराच्या घोषणा करता, पंतप्रधान सांगतात की न खाऊंगा, न खाने दूंगा! किमान त्याच्याशी तरी प्रामाणिक रहा. घाटे यांनी त्याला हरकत घेतली. पंतप्रधानांचे नाव यात घ्यायचे कारण नाही; दर वेळी भरकटत बोलत असता, विषयावर बोला, असे घाटे म्हणाले. त्यामुळे जगताप संतापले. मला काय बोलायचे ते शिकवू नका, हा बोलण्यावर बंदी आणण्याचाच प्रयत्न आहे, असे ते म्हणाले.सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनीही जगताप प्रत्येक विषयात राजकारण आणतात, काम करायचे की नाही ते त्यांनी सांगू नये, विषयावर बोलावे, ते तसे बोलत नाही व हरकत घेतली की चिडतात याला काही अर्थ नाही, असे भिमाले म्हणाले. त्यावरून आणखी गदारोळ झाला.विरोधी पक्षनेते राष्ट्रवादीचे चेतन तुपे, माजी महापौर प्रशांत जगताप, बाबूराव चांदेरे, दिलीप बराटे यांनी घोषणा सुरू केल्या, काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांचीही त्यांना साथ मिळाली. दरम्यान जगताप व घाटे यांच्यात शाब्दिक चकमकच सुरू झाली. भाजपाच्या सदस्यांनीही राष्ट्रवादीला प्रत्युत्तर दिले.महापौर मुक्ता टिळक या सगळ्या गोंधळात सदस्यांना शांततेचे आवाहन करत होत्या; मात्र कोणीही त्यांचे ऐकून न ऐकल्यासारखे करत गोंधळ करत होते. त्यातच महापौरांनी राष्ट्रवादीच्या सुनील टिंगरे यांना बोलण्यास परवानगी दिली.साखळी करणाºया ठेकेदारांना पाठीशी घालणार नाही, त्यांना कोणत्याही नगरसेवकाचा पाठिंबा असला तर त्यांनाही सांगण्यात येईल, असे महापौर म्हणाल्या. त्यानंतर टिंगरे यांचे भाषण सुरू झाले व वातावरण शांत झाले.तीन सदस्यांना महापौर बनण्याची संधी...महापौर मुक्ता टिळक पूर्वनियोजित कामामुळे निघून गेल्यानंतर तीन सदस्यांना महापौरपदी बसण्याची संधी मिळाली. राष्ट्रवादीच्या सुमन पठारे, शिवसेनेच्या संगीता ठोसर व भाजपचे सुनील कांबळे यांनी सभेचे कामकाज चालवले. सदस्यांनी ते महापौरांच्या खुर्चीवर बसले असताना छायाचित्र काढून त्यांचे अभिनंदन केले.
राष्ट्रवादी-भाजपात हमरीतुमरी, पक्षीय टीकेवरून रोष, जगताप, घाटे यांच्यात शाब्दिक चकमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 4:45 AM