पुणे : गोरगरिबांच्या हक्काचे रेशनिंगवरील तब्बल ४०० पोती धान्य बचत गटाने काळ्याबाजारात विकण्याचा प्रयत्न केला असून गुन्हे शाखेच्या पोलिसांनी हा प्रयत्न हाणून पाडला. पोलिसांनी २६ लाख ७९ हजार रुपयांचा २०० पोती गहू आणि २०० पोती तांदळासह ट्रक व टेम्पो जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी घोरपडीमधे ही कारवाई केली असून नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैशाली काकासाहेब कांबळे (रा. शिंदेवस्ती, घोरपडी गाव), गोरख किसन कुऱ्हाडे (वय २८, रा. कात्रज-कोंढवा रस्ता, इस्कॉन मंदिराच्या मागे, मूळ रा. डोंबलवाडी, ता. कर्जत, जि. नगर), अनिल किसन मटकर (वय ३२, रा. १३५, काळुबाई झोपडपट्टी, माळवाडी, हडपसर), शंकर शांताराम गायकवाड (रा. काळेपडळ, हडपसर), विलास किसन मटकर, उमेश शंकर मारकड (रा. शेलारवस्ती, देहूरोड), रमेश किसन मटकर, उत्तरेश्वर दत्तू बोराडे (वय ४२, रा. खेडशिवापूर) यांच्यासह आणखी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अन्नधान्य वितरण कार्यालयातील पुरवठा निरीक्षक अनिता वसंत शिनगारे (वय ४६, रा. येरवडा) यांनी फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घोरपडी गावातील ‘कल्याणी बचत गटा’कडे शासकीय रेशन दुकानाचा परवाना आहे. गोरगरिबांच्या हक्काचे धान्य त्यांना वितरित करण्याची जबाबदारी असलेल्या या बचत गटाला २०० पोती तांदूळ आणि २०० पोती गहू मिळालेला होता. हे सर्व धान्य काळ्याबाजारामध्ये विक्रीसाठी शासकीय गोण्यांमधून दुसऱ्या गोण्यांमध्ये भरले जात असून हे सर्व धान्य ट्रकमध्ये चढवले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून एक ट्रक व एक टेम्पो ताब्यात घेतला.
रेशनमाफिया अडकले जाळ्यात
By admin | Published: October 27, 2016 5:13 AM