पुणे : अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर रविवारी गुलटेकडी मार्केट यार्डातील फळ विभागामध्ये पुणेकरांनीआंबा खरेदीसाठी गर्दी केली, परंतु रत्नागिरी हापूसचे दर अद्यापही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरच असल्याने पुणेकरांनी ‘रत्नागिरी’ हापूसची चव ‘कर्नाटक’ हापूसवर भागविली.कर्नाटक हापूस ३०० ते ५०० रुपये डझनने मिळत असून, रत्नागिरी हापूसचे दर ५०० ते ७०० रुपये डझन असल्याचे रत्नागिरी हापूस आंब्याचे व्यापारी अरविंद मोरे यांनी सांगितले.यंदा सुरुवातीपासूनच रत्नागिरी आणि देवगड हापूस आंब्याचे दर चढे आहेत. तीन-चार दिवसांपासून मार्केट यार्डामध्ये आंब्याची आवक वाढली आहे. रत्नागिरी तयार हापूस मात्र मागणीच्या तुलनेत कमी आहे. यामुळे कच्च्या आंब्याची आवक वाढूनही हापूसचे दर मात्र कमी झाले नाहीत.रविवारी कच्च्या रत्नागिरी हापूस आंब्याची सुमारे १० ते १२ हजार पेट्या आवक झाली. तीन-चार दिवसांपासून ही आवक कायम असली तरी तयार आंबा तुलनेत कमी आहे. यामुळे होलसेल मार्केटमध्ये रत्नागिरी तयार हापूसच्या ४ ते ८ डझनचे दर १५००-३००० रुपये आहेत.कर्नाटक हापूसचे दर घटलेकर्नाटक हापूसच्या तब्बल १८ हजार ते २० हजार पेट्यांची आवक झाली. तीन-चार दिवसांत ही आवक २५ ते ३० टक्क्यांनी वाढली. यामुळे दरामध्ये २० ते २५ टक्क्यांची घट झाली आहे, असे व्यापारी रोहन उरसळ यांनी सांगितले.
‘रत्नागिरी’ची चव ‘कर्नाटक’वर! ‘हापूस’ सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरच
By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2019 3:21 AM