बावडा : संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या इंदापूर तालुक्यातील बावडा-लाखेवाडी जिल्हा परिषद गटातील अटीतटीच्या निवडणुकीत माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मातोश्री रत्नप्रभा पाटील या अपेक्षेप्रमाणे मतांची चांगली आघाडी घेत राष्ट्रवादीच्या वनिता घोगरे यांचा पराभव करत आपला गड राखला. रत्नप्रभा पाटील या जिल्हा परिषदेतील सर्वांत ज्येष्ठ सदस्य म्हणून कार्यरत राहणार आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीतील उमेदवारांची नावे जाहीर झाल्यापासून संपूर्ण जिल्ह्यात प्रतिष्ठेची लढत म्हणून बावडा-लाखेवाडी गटाकडे पाहिले जात होते. याचे कारणही तसेच होते. माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी या गटातून आपल्या मातोश्री रत्नप्रभा शहाजीराव पाटील यांना उमेदवारी देऊन राष्ट्रवादीपुढे मोठे आव्हान उभे केले होते. त्या मानाने राष्ट्रवादी काँग्रेसकडे या तोडीस तोड उमेदवार नसूनही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दंड थोपटून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ जेष्ठ नेते अशोक घोगरे यांच्या सौभाग्यवती वनिता अशोक घोगरे यांना उमेदवारी दिली. मातोश्रींच्या विजयासाठी पाटील यांनी संयमी प्रचार केला. त्यामुळे याच गटातील आम्रपाली तोरणे यांनी त्यांना पाठिंबा दिला. पाटील यांनी त्यांच्या मातोश्रींना दिलेल्या उमेदवारीवरून राष्ट्रवादीकडून तालुक्यात बरेच आरोप झाले. एवढेच काय, पण राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीदेखील रत्नप्रभा पाटील यांच्या उमेदवारीवरून इंदापूर तालुक्यात येऊन बरीच टीका केली होती. परंतु या टीकेला हर्षवर्धन पाटील यांनी संयम पाळत मतांमधून उत्तर देण्याचे मतदारांनाच आवाहन केले. दुसरीकडे याच गटातील लाखेवाडी गणातून इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आप्पासाहेब जगदाळे यांनी आपले बंधू प्रदीप जगदाळे यांना उमेदवारी देऊन पाटलांपुढे कडवे आव्हान दिले. त्यात ते यशस्वी झालेही. प्रदीप जगदाळे यांनी काँग्रेसचे उमेदवार संजय बोडके यांचा ३०४१ मतांनी पराभव करत काँग्रेसच्या बालेकिल्ल्यास खिंडार पाडले. आप्पासाहेब जगदाळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी नीरा नदीचा काठ अक्षरश: पिंजून काढून प्रदीप जगदाळे यांना निवडून आणण्यात यश संपादित केले. त्याचबरोबर बावडा गणातील काँग्रेसच्या उमेदवार रोहिणी घोगरे यांनी वसुधा घोगरे यांचा तब्बल ३५७३ मतांची तालुक्यात पहिल्या क्रमांकाची आघाडी घेत विजय संपादन केला.पूर्वीपासून बावडा-लाखेवाडी हा जिल्हा परिषद गट म्हणजे काँग्रेसचे अर्थातच पाटील यांचे काळीज म्हणजेच बालेकिल्ला म्हणूनच राहिला आहे. (वार्ताहर)
रत्नप्रभा पाटील सर्वांत ज्येष्ठ सदस्य
By admin | Published: February 25, 2017 2:16 AM