पुणे : वर्षभरापूर्वी भीमा काेरेगाव येथे क्रांतीदिनी झालेल्या हिंसाचारावरुन देशभरात वातावरण तापलेले असताना अाता भीम अार्मी संघटनेचे संस्थापक चंद्रशेखर अाझाद तथा रावण पुण्यामध्ये येणार अाहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भीम अार्मी पुणे शहर जिल्हा शाखेच्या वतीने अनेक कार्यक्रमांचे अायाेजन केले अाहे. याबाबतची माहिती भीम अार्मीचे जिल्हा प्रमुख दत्ता पाेळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.
चंद्रशेखर रावण हे प्रथमच महाराष्ट्रात येत अाहेत. तीन वर्षांपूर्वी तरुण वकील चंद्रशेखर रावण यांनी भीम अार्मीची स्थापना केली हाेती. या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी विविध सामाजिक कामे केली अाहेत. त्यांच्या पुणे दाैऱ्यात 30 डिसेंबर 2018 राेजी पुण्यातील एस एस पी एम एस ग्राऊंडवर राज्यस्तरीय भीमा काेरेगाव संघर्ष महासभेचे अायाेजन करण्यात अाले अाहे. तसेच 31 डिसेंबर राेजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात संवाद अांबेडकरी तरुणाईशी या कार्यक्रमाचे अायाेजन करण्यात अाले असून या कार्यक्रमात विद्यार्थी व तरुण वर्गाशी अॅड. चंद्रशेखर अाझाद थेट संवाद साधणार अाहेत. तसेच चळवळीच्या विविध विषयांवर चर्चा करणार अाहेत. 1 जानेवारी 2019 राेजी भीमा काेरेगावच्या क्रांतीस्तंभास अभिवादन करुन हेलीकाॅप्टरच्या माध्यमातून विजय स्तंभावर पुष्पवृष्टी केली जाणार अाहे. या संपूर्ण अॅड चंद्रशेखर अाझाद यांच्या तीन दिवसीय कार्यक्रमाची संघटनेच्या वतीने तयारी सुरु करण्यात अाली अाहे. 30 डिसेंबच्या भीमा काेरेगाव संघर्ष महासभेत चंद्रशेखर काय बाेलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले अाहे.
इंग्रज अाणि पेशव्यांमध्ये झालेल्या लढाईत महार बटालीयनने माेठी कामगिरी बजावली हाेती. 1 जानेवारी 1818 मध्ये इंग्रजांनी पेशव्यांचा पराभव केला हाेता. यंदा या लढाईला 201 वर्षे पूर्ण हाेणार अाहेत. भीमा काेरेगाव येथे या लढाईत हुतात्मा झालेल्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ विजयस्तंभ उभारण्यात अाला अाहे. दरवर्षी लाखाे अांबेडकरी जनता या विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी येत असते. या वर्षाच्या सुरुवातीलाच या ठिकाणी झालेल्या हिंसाचारामुळे देशभरात तणावाचे वातावरण निर्माण झाले हाेते.