पुणे: भाजपच्या बालेकिल्ल्यात महाविकास आघाडीचा झेंडा फडकवून विजय मिळवणारे नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर अ्ॅक्शन मोडवर आले आहेत. निवडून आल्यानंतर लगेचच त्यांनी कामाला सुरुवात केली आहे. कसबा मतदारसंघाच्या विकासासाठी आगामी बजेट मध्ये 10 कोटींची तरतूद करण्याची मागणी त्यांनी पुणे मनपा आयुक्तांसमवेत झालेल्या बैठकीत केली आहे.
प्रभाग 16,17,18,19 आणि 29 अशा सर्व प्रभागातील विकासकामासाठी प्रत्येकी 2 कोटीची तरतूद करण्याची मागणी केली आहे. मिळकत कर, सुरळीत पाणीपुरवठा या महत्वाच्या प्रश्नांबाबत पुणे महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांची भेट घेऊन आमदारकीच्या कामाचा श्रीगणेशा केला असल्याचे धंगेकर यांनी सांगितले आहे.
मिळकत कर, पाणीपुरवठा नियोजयाबाबत पाठपुरावा
पुणेकरांच्या मिळकत करात ४० टक्के सूट द्यावी, मुंबई प्रमाणेच पुण्यातही ५०० चौरसफुटांच्या खालील सदनिकांवर मिळकत कर आकारू नये, पेठांच्या भागांमध्ये समानदाबाने व सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी योग्य नियोजन करावे. अशा विविध मागण्या केल्या आहेत. संपूर्ण देशात पुण्यात मिळकत कर सर्वाधिक असून नागरिकांना मिळकत करात ४० टक्के सवलत देऊन त्यांना आधार देणे गरजेचे आहे. तसेच मुंबई प्रमाणेच पुण्यातही ५०० चौरसफुटांच्या खालील सदनिकांवर मिळकत कर आकारला जाऊ नये. त्यामुळे छोट्या सदनिका धारकांना मोठा दिलासा मिळेल. या संदर्भात विधीमंडळात मी प्रश्न उपस्थित करणार असून राज्यशासनाकडे त्याचा पाठपुरावा ते करणार आहेत. याबरोबरच पेठांच्या भागांमध्ये दाट वस्ती असून तेथे पाणीपुरवठा अनियमित व कमी दाबाने होतो. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून त्यांना दिलासा देण्यासाठी तातडीने सुरळीत पाणीपुरवठा होण्याकरिता योग्य नियोजन करून अंमलात आणावे अशी मागणी त्यांनी अतिरिक्त आयुक्तांकडे केली.
या सर्व प्रश्नांकडे प्रशासन गांभीर्याने विचार करेल आणि योग्य तो निर्णय लवकर घेतला जाईल असे आश्वासन अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी दिले असल्याचे धंगेकर यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून सांगितले आहे.