पुणे: कसबा पोटनिवडणुकीत भाजपचे हेमंत रासने यांचा पराभव करून महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर यांनी विजय मिळवला. तब्बल ३० वर्षानंतर भाजपच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसने सत्ता मिळवून इतिहास घडवला. त्यानंतर सर्वच स्तरावरून धंगेकरांचे कौतुक होऊ लागले आहे. पुण्याच्या पेठांमध्ये तर जागोजागी रवीभाऊंच्या शुभेच्छांचे बॅनरही लागले आहेत. अशातच सदाशिव पेठेत एक स्पेशल ऑफरचे बॅनर लावण्यात आले आहे. त्यावर धंगेकर विजयी झाल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले आहे. तसेच त्यानिमित्ताने एका रोल वर एक फ्री अशी ऑफर ठेवण्यात आली आहे.
कालच रवींद्र धंगेकर हे ११ हजार मतांनी निवडून आले. त्यानंतर शहरात सर्वत्र त्यांच्या विजयाचा जल्लोष करण्यात आला. तर ग्रामीण भागातही रवीभाऊ विजयी झाल्याचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. त्याप्रमाणे सदाशिव पेठेतील एका हॉटेल व्यावसायिकाने भन्नाट ऑफर काढून आनंदोत्सव साजरा केला आहे. त्याने स्वतःच्या हॉटेल बाहेर रोलचे बाय वन गेट वन फ्री असे बॅनर लावण्यात आले आहे. ही ऑफर दोन दिवस सुरू राहणार आहे.
धंगेकरांच्या विजयानंतर सुरु होता जल्लोष
रवींद्र धंगेकर यांच्या विजयनानंतर संपूर्ण शहरात जल्लोषाला सुरुवात झाली होती. ‘गणपती बाप्पा मोरया’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘कोण आला रे कोण आला, कसब्याचा वाघ आला’, ‘पुणेकरांना परिवर्तन पाहिजे होते ते मिळाले’, ‘शाहू, फुले, आंबेडकर निवडून आले धंगेकर’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. तोपर्यंत कार्यकर्त्यांनी एमकमेकांवर गुलाल उधळत, ताशाच्या तालावर नाचण्यास सुरूवात केली होती. १२ वाजून ५ मिनिटांनी रवींद्र धंगेकर यांचे मतमोजणी केंद्राच्या परिसरात आगमन होताच, कार्यकर्त्यांनी त्यांना गराडा घालत खांद्यावर उचलून घेतले. यावेळी मविआच्या महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची देखील मोठी गर्दी दिसून आली. यावेळी काही कार्यकर्त्यांनी विशेष कपडे शिऊन घेतले होते. त्यावर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे गटाचे चिन्ह आणि डोक्यावरील गांधी टोपीवर ‘मी रवी धंगेकर’ असा गणवेश परिधान केला होता. यावेळी पोलिसांचा देखील तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. वरिष्ठ पोलिस अधिकारी देखील मतमोजणी केंद्राला भेट देत होते.