पुणे: रवी शाळेत असताना एकदम साधा मुलगा होता. अभ्यासापेक्षा त्याचे खेळांवरच जास्त लक्ष होते. त्याचवेळी त्याच्यातील नेतृत्व गूण दिसायचे. कब्बडी संघाचे नेतृत्व त्याने केले होते. आमदार झाल्यानंतरही त्याने तसेच रहावे, किंबहूना तो तसाच राहिल याची खात्रीच आहे. कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत विजयी झालेले रविंद्र धंगेकर यांच्या शाळेतील आठवणींना त्यांचे त्यावेळचे शिक्षण रविंद्र साळुंखे यांनी या विजयानिमित्त उजाळा दिला. सन १९८५ ते १९९० या कालावधीत इयत्ता ५ वी ते ८ वी पर्यंत रविंद्र साळुंखे गुरूजींचे विद्यार्थी होते. राजा धनराजा गिरजी ही त्यांची शाळा. त्यांचे प्राथमिक शिक्षणही याच शाळेत झाले.
साळुंखे गुरूजींनी सांगितले की, रवीच काय, पण आमच्या शाळेतील बहुसंख्य मुले ही गरीब घरांमधून आलेली. पालकांनी आपली मुले शिकावीत, मोठी व्हावीत या उद्देशाने शाळेत टाकलेली. मात्र घरच्या गरीबीमुळे या मुलांना अनेकदा फीसाठी, पुस्तकांसाठी पैसेच नसत. अशा वेळी शाळाच त्यांचे पैसे भरत असे. रवीचे त्यावेळचे मित्र म्हणजे ॲड. प्रताप परदेशी, डॉ. मिलिंद भोई. रवीला अभ्यासापेक्षाही खेळांची आवड होती. त्यातही कुस्ती व कब्बडी हे त्याचे आवडते खेळ होते. कब्बडी संघाचे त्याने नेतृत्वही केले होते. शाळेतील त्याचे येणे अनियमीत असायचे. त्यावरून मी त्याला बोलायचो. तेवढ्या वेळेपुरते त्याच्यात सुधारणा व्हायची, मात्र परत सुट्टया सुरू व्हायच्या असे साळुंखे यांनी सांगितले
मला त्यावेळी लक्षात आलेली एक गोष्ट म्हणून रवी किंवा त्यांच्या मित्रांनाही आपल्या घरच्या परिस्थितीची जाणीव होती. त्यामुळे काहीतरी करून घरात हातभार लावण्याची त्यांची धडपड असायची. त्यांच्या या साधेपणामुळेच पुढे माझे बहुतेक विद्यार्थी मोठे झाले. रवीशिवाय, विशाल धनवडे, वनराज आंदेकर, सरहद चे संस्थापक संजय नहार हेही माझे राजा धनराज गिरजी शाळेतीलच विद्यार्थी अशी माहिती साळुंखे यांनी दिली.
मी रविंद्रच्या मतदारसंघातच राहतो. कसबा पेठेत माझे घर आहे. शाळेचा माजी विद्यार्थी संघ आहे. या संघाच्या उपक्रमाला रवीसह सगळेच माजी विद्यार्थी मदत करतात. ते सगळे रवीच्या प्रचारात होते. मीसुद्धा त्याचा प्रचार केला. मला त्यात काही वावगे वाटले नाही. तो कामाचा माणूस आहे. कोणाच्याही अडचणीला तत्काळ उभा राहतो. नगरसेवक असताना तो असाच साधा होता. आता आमदार झालाय, पण तो असाच साधा राहिल याची मला खात्री आहे असे साळुंखे म्हणाले.