पुणे : मोक्यासारख्या गंभीर गुन्हयात फरारी असलेला माहिती अधिकार कार्यकर्ता रविंद्र ब-हाटे याला आश्रय देणा-या वकिलाला पोलिसांनीअटक केली. याच वकिलाच्या घरातून पोलिसांना आव्हान देणारे व्हिडिओ ब-हाटे याने सोशल मीडियावरून व्हायरल केले होते. मात्र शोध घेऊनही ब-हाटे पोलिसांना सापडत नव्हता. राज्यभर पोलीस शोध घेत असताना पुण्याजवळच तो अधिक काळ लपून बसला होता, अखेर तो पोलिसांच्या जाळ्यात सापडला.
सागर संजय म्हस्के ( वय ३२ रा.म्हस्के वस्ती, कळस आळंदी रस्ता) असे अ़टक केलेल्या वकिलाचे नाव आहे. एक डझनहून अधिक गुन्हे दाखल असलेल्या रविंद्र ब-हाटेला फरार मुदतीत रूमवर राहण्यास आश्रय दिल्याप्रकरणी मस्के याला अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखा १ चे सहायक पोलीस आयुक्त सुरेंद्रकुमार देशमुख या गुन्ह्याचा तपास करीत आहेत. फिर्यादीचे रो हाऊस जबरदस्तीने हडपण्यासाठी जीवे मारण्याची धमकी देत बनावट दस्तबनवण्याबरोबरच खंडणी मागितल्याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात रविंद्र ब-हाटे याच्यासह १३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
त्यात ब-हाटेवरमोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली. ब-हाटे हा दीड वर्षे पोलिसांना गुंगारा देत होता. तो आळंदी रस्त्यावरील म्हस्के वस्ती येथे सागर म्हस्के याच्या घरात राहात असल्याचे निष्पन्न झाले आहे. ब-हाटे याला फरार राहाण्यास आणि त्याचे अस्तित्व लपविण्यास मदत केल्याप्रकरणी सागर म्हस्के याला गुरूवारी (दि.२६) पावणे सात वाजता अटक करण्यात आली.