लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : जमीन लाटणे, फसवणूक व धमकावणे़, खंडणी अशा विविध गुन्ह्यासह मोक्का कारवाई केल्यानंतरही गेली दीड वर्षे पोलिसांना गुंगारा देणारा माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटेला गुन्हे शाखेने आज दुपारी अटक केली.
गुन्हे शाखेने बऱ्हाटेची चारी बाजूने कोंडी केली. त्यामुळे त्याला शरण येण्याशिवाय पर्याय राहिला नाही.
बांधकाम व्यावसायिकाला धमकी देऊन त्याची मालमत्ता लाटण्याचा, तसेच खंडणी वसूल केल्याप्रकरणी रवींद्र बऱ्हाटे, पत्रकार देवेंद्र जैन, बडतर्फ पोलीस शैलेश जगताप यांच्यावर कोथरूड पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यानंतर बऱ्हाटे हा फरार झाला होता.
रवींद्र बऱ्हाटेच्या शोधासाठी शहर पोलिसांनी जंग जंग पछाडले होते. नुकतीच त्यांची पत्नी संगीता, मुलगा मयूर यांच्याबरोबर पितांबर धिवार, अॅड. सुनील मोरे यांना अटक केली होती. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या सूचनेनुसार गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांनी गुन्हे शाखेच्या वेगवेगळ्या पथकांमार्फत रवींद्र बऱ्हाटेच्या संपर्कात असलेल्या व त्यांच्या जवळच्या लोकांना अटक करण्यास सुरुवात केली.
पोलिसांनी चारी बाजूने फास आवळत आणल्याने सर्व मार्ग बंद होत असल्याचे दिसल्यावर मंगळवारी (दि. ६) बऱ्हाटेने पोलिसांशी संपर्क साधून आपण पोलीस आयुक्तालयात येत असल्याचे कळविले. त्यानुसार आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास तो पोलीस आयुक्तालयात आला. पोलिसांनी त्याला अटक केली. हडपसर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या तसेच मोक्का अंतर्गत कारवाई केलेल्या गुन्ह्यात रवींद्र बऱ्हाटेला गुन्हे शाखेने अटक केली आहे. सहायक पोलीस आयुक्त सुरेंद्रनाथ देशमुख अधिक तपास करीत आहे.
बऱ्हाटे याच्याविरुद्ध ३ मोक्का कारवाईसह एकूण १२ गुन्हे दाखल आहेत. त्याच्याकडे एकूण २ हजार कोटी रुपयांहून अधिक रकमेची जमिनीची कागदपत्रे, कोरे धनादेश सापडले आहेत. पोलिसांनी त्याची मालमत्ताही जप्त केली आहे. या गुन्ह्यांचे स्वरुप व त्याच्यावर करण्यात आलेली मोक्का कारवाई पाहता आता त्याची पोलिसांच्या तावडीतून सुटका होण्याची शक्यता दिसत नसल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.