पुणे : काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्यातील विधानसभा उमेदवारांची पहिली यादी पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी गुरुवारी (दि. २४) दिल्लीहून जाहीर केली. त्यात रवींद्र धंगेकर कसबा विधानसभा मतदार संघातून संधी देण्यात आली आहे. शहरातील कँन्टोन्मेट आणि शिवाजीनगर या दोन विधानसभा मतदार संघांतील नावे मात्र अद्याप निश्चित झालेली नाहीत.
कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र, २०१९ च्या पोटनिवडणुकीने याला छेद दिला. या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांनी भाजपच्या हेमंत रासने यांचा पराभव केला होता. आगामी निवडणुकीत काँग्रेस गेल्या विजयाची पुनरावृत्ती करणार की भाजप पुन्हा आपला गड राखणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
कसबा पेठ हा भाजपचा बालेकिल्ला मानला जायचा. यापूर्वी २८ वर्षांपासून या मतदारसंघावर भाजपचे वर्चस्व राहिले आहे. १९९५ पासून २०१९ पर्यंत गिरीश बापट पाचवेळा आणि २०१९ मध्ये मुक्ता टिळक निवडून आल्या होत्या. मात्र, २०२३ मध्ये मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक झाली. त्या निवडणुकीत भाजपचे हेमंत रासने आणि काँग्रेसकडून माजी नगरसेवक रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली. या निवडणुकीत धंगेकर यांनी विजय मिळविला होता. धंगेकर यांना ७३ हजार ३०९ मते, तर रासने यांना ६२ हजार २४५ मते मिळाली होती. धंगेकर यांनी रासने यांच्यावर १० हजार ९१५ मताधिक्य मिळविले होते.
आगामी विधानसभा निवडणुकीत धंगेकर निवडून येणार कि भाजपचं आपला बालेकिल्ला पुन्हा जिंकणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. पण अजूनही भाजपने कसब्यात उमेदवार दिलेला नाही. बहुतेक प्रतिस्पर्धी उमेदवाराची ते वाट बघत असल्याचे समजते आहे. पोटनिवडणुकीत जरी काँग्रेसने विजय मिळवला असला तरी लोकसभेत मात्र कसब्यातून भाजपला मताधिक्य मिळाल्याचे दिसून आले आहे. खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या विरुद्ध रवींद्र धंगेकर यांनी लोकसभा लढवली होती. त्यावेळी कसबा मतदार संघातूनच धंगेकरांना सर्वात कमी मतदान झाल्याचे समोर आले होते. मुरलीधर मोहोळ यांना कसब्यातून धंगेकरांपेक्षा अधिक मताधिक्य मिळाले होते. त्यामुळे कसबा विधानसभेची लढत चुरशीची होणार असल्याचे दिसत आहे. भाजप आता कोणाला संधी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.