पुणे: महाविकास आघाडीचे पुणे शहर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्याकडे ८ कोटी १६ लाख ६५ हजार १४३ रुपयांची स्थावर आणि जंगम अशी मालमत्ता आहे. त्यांच्यावर एकूण ७१ लाख १५ हजार ४३५ रुपयांचे कर्ज आहे. विशेष म्हणजे गेल्याच वर्षी झालेल्या पोटनिवडणुकीत आमदार झालेल्या धंगेकरांच्या संपत्तीत आमदार झाल्यावर वाढ होण्याऐवजी घट झाली आहे.
धंगेकर हे आठवी उत्तीर्ण आहेत. धंगेकर यांच्याकडे रोख ७६ हजार ४०० रुपये, तर पत्नीकडे ६२ हजार १०० रुपये आहेत. धंगेकर आणि त्यांच्या कुटुंबीयांचा शेती, सोने-चांदी कारागिरी आणि बांधकाम व्यवसाय आहे. धंगेकर यांची जंगम मालमत्ता २३ लाख २६ हजार ८३ रुपये, तर पत्नीकडे ७२ लाख ३८ हजार ४४३ रुपयांची मालमत्ता आहे.
धंगेकर यांची स्वसंपादित आणि वारसाप्राप्त स्थावर मालमत्ता ४ कोटी ५९ लाख ६३ हजार ९५८ आहे, तर पत्नीकडे २ कोटी ६० लाख ७२ हजार ९९४ रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. धंगेकर यांच्याकडे दोन दुचाकी, दहा तोळे सोने, तर पत्नीकडे १५ तोळे सोने आहे. धंगेकर यांच्या रविवार पेठ, मंगळवार पेठ, कसबा पेठ आणि शिवाजीनगर येथे सदनिका आहेत. धंगेकर यांची दौंड तालुक्यात पिंपळगाव आणि हवेली तालुक्यात नांदोशी येथे शेती असून, कोथरूड येथे साडेचार हजार चौरस फुटांची बिनशेती जागा आहे. धंगेकर यांच्यावर आठ प्रलंबित खटले आहेत.
एका वर्षात मालमत्तेत २३ लाखांनी घट
गेल्यावर्षी कसबा पोटनिवडणुकीसाठी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात धंगेकर यांनी स्वत:ची जंगम मालमत्ता ४७ लाख ६ हजार १२८ दाखविली होती. आता लोकसभेसाठी २३ लाख २६ हजार ८३ रुपये दाखविली आहे. त्यामुळे त्यांच्या मालमत्तेत एका वर्षात २३ लाखांनी घट झाली आहे.