सोमेश्वरनगर : करंजे परिसरातील सोरटेवाडीमधील कर्चेवाडी ही अवघी चाळीस घरांची वस्ती म्हणजे रवींद्र धंगेकर यांचे आजोळ. या आजोळात ते राहिल्याने त्यांचा सोमेश्वरनगर सह होळ-करंजे परिसरात दांडगा जनसंपर्क होता. त्यामुळे कसब्यातील विजयाचा आनंद कसब्यातील मतदारांसोबत होळ-करंजे परिसरातील जनतेलाही झाला. फटाके फोडून हा आनंद लोकांनी व्यक्त केला.
रवींद्र धंगेकर यांचे आजोबा दिनकर कर्चे यांना भगवान, दिगंबर, माऊली, पांडुरंग व सुलाबाई अशी पाच अपत्य. माऊली कर्चे हे माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांचे कट्टर कार्यकर्ते होते. सध्या पांडुरंग कर्चे व सुलाबाई हेच हयात आहेत. रवींद्र धंगेकर यांच्या आई सुलाबाई यांचा दौंड येथील हेमराज धंगेकर यांच्याशी विवाह झाला. रवींद्र धंगेकरांचे वडील हे दौंड तालुक्यातील नाथ्याचीवाडी गावचे. मूळ झाडगे आडनाव असलेले धंगेकरांकडे पुण्यात दत्तक गेले होते. रवींद्र यांना खेडेगावाची जास्त ओढ होती. त्यामुळे त्यांचे पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण आजोळाला म्हणजे कर्चेवाडीनजीक आठफाटा जिल्हा परिषद शाळेत झाले.
कर्चेवाडीतील मित्रांसोबत तीन किलोमीटर शाळेला चालत जायचे. पुढील शिक्षणासाठी पुण्यात गेले. राजकारणात रमले. नगरसेवक झाले. आमदारकीच्या मागील निवडणुकीत गिरीश बापट यांना घाम फोडून राज्याच्या नजरेत आले. मात्र त्यानंतरही त्यांचे आजोळाशी संबंध कमी झाले नाहीत. आजही ते प्रत्येक यात्रा, सण, कौटुंबिक कार्यक्रम याला उपस्थित राहतात. करंजे परिसरात अनेक ग्रामस्थांशी त्यांचे वैयक्तीक संबंध आहेत. कर्चेवाडीतील त्यांच्या मामाची मुले बाळासाहेब कर्चे, शांताराम कर्चे, पांडुरंग कर्चे, राजेंद्र कर्चे, पोपट कर्चे यांच्यासह होळ, करंजे परिसरातील अनेक लोक कसब्यातील प्रचारात कष्ट करत होते. त्यामुळे आजच्या निकालात जशी कसब्यातील मतदाराला धाकधूक होती/ तशीच कर्चेवाडीलाही धाकधूक होती. अकरा हजारांनी धंगेकरांनी विजय मिळविल्यावर कर्चेवाडीत जल्लोष झाला. करंजेपूल येथील मुख्य चौकात करंजे पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी जमा होत फटाक्यांची आतषबाजी केली.
धंगेकरांच्या मामाचे चिरंजीव शांताराम कर्चे म्हणाले, आम्हाला सकाळपासून धाकधूक लागली होती. विजय मिळताच आमच्या गावात, घरात विजयोत्सव साजरा झाला. त्यांना विजय मिळाल्यावर दिवाळीसारखा आनंद झाला.