रवींद्र धंगेकरांचा भाजपावर गंभीर आरोप, म्हणाले, ‘पुण्यात पैशांचे ट्रक आलेत, आज फडणवीस वाटप करतील’
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2024 01:04 PM2024-05-11T13:04:07+5:302024-05-11T13:08:42+5:30
Maharashtra Lok Sabha Election 2024: यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपाचे मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) आणि काँग्रेसचे रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांच्यात लढत होत आहे. त्यामुळे मागच्या दहा वर्षांपासून भाजपाच्या ताब्यात असलेल्या या अटीतटीची लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपाचेमुरलीधर मोहोळ आणि काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांच्यात लढत होत आहे. त्यामुळे मागच्या दहा वर्षांपासून भाजपाच्या ताब्यात असलेल्या या अटीतटीची लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच मतदानाची तारीख जवळ येत असतानाच रवींद्र धंगेकर यांनी भाजपावर गंभीर आरोप केले आहेत. पुण्यामध्ये पैशांचे ट्रक आले आहेत, तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्याचं वाटप होणार आहे, असा दावा धंगेकर यांनी केला आहे.
भाजपावर गंभीर आरोप करताना रवींद्र धंगेकर म्हणाले की, मतदानाला दोन दिवस राहिले असताना, भाजपाचे कार्यकर्ते, पोलीस, गुन्हेगार यांची दादागिरी सुरू झाली आहे. पुण्यामध्ये पैशांचे ट्रक येऊन थांबले आहेत. या ट्रकमधील पैशांचं देवेंद्र फडणवीस आज वितरण करतील. या निवडणुकीसाठी भाजपानं प्रचंड पैसा आणला आहे. प्रत्येक कार्यकर्त्याकडे करोडो रुपये आहेत. तसेच ते वाटायला आता सुरुवात करतील. पोलीस खातं, निवडणूक आयोग याकडे दुर्लक्ष करणार, असा आरोप धंगेकर यांनी केला. निवडणूक आयोग देशाचं ऐकत नाही तर माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याचं काय ऐकणार, असेही रवींद्र धंगेकर म्हणाले.
दरम्यान, भाजपा उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी रवींद्र धंगेकर यांना प्रत्युत्तर दिलं आहे. रवींद्र धंगेकर यांना स्टंटबाजी करायची सवय झाली आहे. कुठलं तरी स्टेटमेंट करायचं मोठ्या नेत्यांवर बोलायचं. मात्र पुणे कर सुज्ञ आहेत. त्यांना सगळं समजतं. एक दोनदा केलेलं पचून जातं. मात्र वारंवार असं केलं तर लोक त्यावर विश्वास ठेवत नाहीत, असा टोला मोहोळ यांनी लगावला.