पुणे : गुंतवणूकदारांची डीएसके यांनी फसवणूक केल्याच्या प्रकरणात अटक करण्यात आलेले बँक आॅफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र मराठे यांना जामीन मिळावा म्हणून शुक्रवारी कोर्टात अर्ज दाखल करण्यात आला. या अर्जावर सोमवारी (दि. २५ जून) विशेष न्यायाधीश आर. एन. सरदेसाई यांच्या न्यायालयात सुनावणी होणार आहे.मराठे हे सध्या पोलीस कोठडीत आहेत. कोठडीत असतानाच त्यांना जामीन मिळावा म्हणून त्यांच्यातर्फे अॅड. सचिन ठोंबरे, अॅड. शैलेश म्हस्के यांनी अर्ज दाखल केला आहे. डीएसके यांना नियमबाह्य कर्ज दिल्याप्रकरणी मराठे यांच्यासह सहा जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांना २७ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांनी मराठे यांना बेकायदा अटक केली आहे. अटक करण्यापूर्वी रिझर्व्ह बँकेला कळविणे गरजेचे होते. आरबीआय कायदा ५८ इ नुसार तशी परवानगी घेणे गरजेचे असते. अटक केलेल्या अधिकाऱ्यांनी ठेविदारांना ठेवीचे पैसे व्याजासह परत देऊ, असे आश्वासन दिले नव्हते; त्यामुळे त्यांना एमपीआयडी लागू होत नाही, असे या जामीन अर्जात नमूद करण्यात आले आहे.
रवींद्र मराठे यांचा जामिनासाठी अर्ज दाखल, सोमवारी सुनावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 1:13 AM