बारामती: बारामती ग्रामीण पोलीसांनी रविराज तावरे गोळीबार प्रकरणाचा अवघ्या सात तासांत छडा लावला आहे.पोलिसांनीगोळीबार करणाऱ्या अल्पवयीन मुलासह चौघांना अटक केली आहे. राजकीय वैमनस्यातून रविराज तावरेंवर गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे. दरम्यान, रविराज तावरे यांच्यावर येथील गिरीराज रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
तावरे हे सोमवारी(दि ३१) सायंकाळी त्यांची पत्नी समवेत सायंकाळी पावणे सातच्या सुमारास येथील संभाजीनगरला वडापाव घेण्यासाठी आले होते. यावेळी वडापाव घेऊन त्यांनी संबंधित दुकानदाराचे पैसे दिले. त्यानंतर गाडीकडे येत असताना अचानक दुचाकीवर आलेल्या दोघां जणांनी त्यांच्यावर गोळीबार केला. या घटनेनंतर तावरे खाली कोसळले. तर गाडीमध्ये बसलेल्या त्यांच्या पत्नी रोहिणी तावरे यांनी आरडाओरडा केला. त्यामुळे या परिसरात क्रिकेट खेळणारी मुले धावत आली. तोपर्यंत हल्लेखोरांनी गोळीबार करून पळ काढला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,गोळीबार करण्यासाठी आरोपी बुलेट गाडीवरुन आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, पोलिसांनी शोध घेण्यास सुरवात केली.पोलीसांना बातमीदाराकडुन मिळालेल्या माहितीनुसार ,तर दोन आरोपी उरुळीकांचन येथे होते.त्या दोघांना सोमवारी मध्यरात्री ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी एका अल्पवयीन मुलासह राहुल उर्फ रिबेल यादव, प्रशांत मोरे, विनोद उर्फ टॉम मोरे यांना केली अटक केली आहे. बारामती तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे.
बारामती तालुका पोलिसांसह गुन्हे शोध पथकाकडून आरोपींना अटक करण्यात आली आहे. यामध्ये प्रशांत मोरे हा तावरे यांच्यावरील हल्याचा मास्टर माईंड आहे. त्याला मुंबई येथुन गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. या घटनेत गोळीबार करण्यासाठी अल्पवयीन मुलाचा वापर केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.तावरे यांच्या पत्नी जिल्हा परिषद सदस्या रोहिणी तावरे यांनी गोळीबार प्रकरणी फिर्याद दिली आहे. जिल्हा परिषद सदस्या तावरे यांच्या गटात त्यांचे पती रविराज तावरे सामाजिक कार्य करत असतात.या कामांचा प्रशांत मोरे यांना द्वेष ,दुजाभाव असल्याने त्या रागातून मोरे आणि रविराज तावरे यांच्यासमवेत वारंवार वाद होत होते.यामध्ये तावरे यांच्या कार्यकर्त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला जातो,धमक्या दिल्या जातात.यातच कट रचत रविराज तावरे यांच्यावर गोळीबार करत त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.पोलिसांचा आणखी तपास सुरु आहे. तपासात आणखी इतर बाबी पुढे येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
सोमवारी रात्री पोलीस अधिक्षक डॉ अभिनव देशमुख यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. अप्पर पोलीस अधिक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगांवकर यांनी पथकांची निर्मिती करीत तातडीने तपास सुरु केला. त्यामुळे आरोपींचा वेळेत शोध घेणे शक्य झाले.
दरम्यान, रविराज तावरे यांच्यावर येथील गिरीराज रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.पुणे येथील डॉक्टरांच्या पथकाने काल मध्यरात्री दीड ते दोन च्या सुमारास शस्त्रक्रिया करीत तावरे यांच्या शरीरात घुसलेली गोेळी बाहेर काढली आहे.ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचे तावरे यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.———————————————