भोरपासून २७ किलोमीटर अंतरावर असलेल्या व हिंदवी स्वराज्याची शपथ घेतलेला रायरेश्वर किल्ला (पठारावर) सुमारे १२ किलोमीटर लांब व अडीच किलोमीटर रुंद परिसरात आहे. या पठारावर सप्टेंबर ते डिसेंबर दरम्यान विविध प्रकारची रंगीबेरंगी फुले हिरव्यागार वेली एखाद्या गालीच्यासारखी पसरली आहेत. वनदेवतेने अंथरलेल्या अनोखा गालीचा पाहण्यासाठी निर्सगप्रेमी व अभ्यासकांना सदरची फुले नेहमीच खुणावतात.
छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतलेले शिवकालीन शंकराचे मंदिर असून त्या काळात महाराजांनी शिवालयाची देखभाल करण्यासाठी कर्नाटकातून शिवा नावाच्या जंगमाला आणले होते. तेव्हापासून मगील साडेचारशे वर्षांपासून जंगम कुटुंबे किल्यावर राहात आहेत. किल्यावर जिवंत पाण्याचे झरे असून गायमुख आहे. कोर्ले गावावरून शिडीमार्गाने जाणारी वाट गायदरीची पाऊलवाट रायरी गावाजवळील अवघड चढण असलेली वाट या मार्गाने किल्ल्यावर जाता येते.
रायरेश्वर पठार रंगीबेरंगी फुलांनी बहरले असून किल्ल्याच्या पठारावर १० ते १५ प्रकारची रंगीबेरंगी फुलांच्या छटा वाऱ्याच्या झोकात आपला शृंगार करीत असतात. त्यामुळे रंगीबेरंगी फुलांची पठारावर विविध रंगांची उधळण होत असल्याचे पर्यटकांना पहावयास मिळते. हे चित्र पाहण्यासाठी दरवर्षी श्रावण महिन्यात पर्यटक येथे गर्दी करतात.
तसेच अनेक अभ्यासक दिवसभर किल्ल्याची भटकंती करून फुलांचा आणि हिरव्यागार वेलीचा अभ्यासही करतात. सध्या हा फुलांचा बहर लोकांना खुणावत आहे. मात्र कोरोनामुळे सध्या पर्यटन स्थळांवर बंदी घातल्याने फारसे पर्यटक फिरकत नाहीत. त्यामुळे येथील लोकांचा रोजगार बंद झाला आहे. त्यामुळे रायरेश्वर किल्ल्याचा पर्यटनदृष्ट्या विकास करणे गरजेचे आहे.