पुणे : शहरांना आर्थिक विकासाची केंद्रे बनवणे, शहरी पायाभूत सुविधांना वित्तपुरवठा करणे, भविष्यातील आव्हानांसाठी सज्ज करणे, शहरी पायाभूत सुविधा निर्माण करणे, सामाजिक असंतुलन कमी करणे, अशा विविध पैलूंवर आधारीत जी-२० परिषदेची दुसरी बैठक पुणे शहरात येत्या १२ ते १४ जून व १९ ते २२ जून रोजी आयाेजित करण्यात आली आहे.
जी-२० ची पुण्यात यापूर्वी १६ व १७ जानेवारी रोजी पहिली बैठक जे. डब्ल्यू. मॅरियत हॉटेलमध्ये पार पडली होती. त्यानंतर आता दुसरी बैठक जूनमध्ये दोन टप्प्यात होत असून, याची तयारी महापालिकेकडून सुरू करण्यात आली आहे. जी-२० च्या पार्श्वभूमीवर जानेवारी महिन्यात पुणे येथे संपन्न झाली होती, त्यावेळी उद्याच्या शहरांसाठी वित्तपुरवठा या विषयावर उच्चस्तरीय कार्यशाळा संपन्न झाली होती. आता जूनमध्ये होणाऱ्या दोन बैठकांमध्ये पहिल्या बैठकीत १२ ते १४ जून रोजी इलेक्ट्रॉनिक युग या विषयावर चर्चा होणार आहे. तर १९ ते २२ जून च्या बैठकीत शिक्षण या विषयावर बैठक होणार आहे. दोन्ही बैठकीला जगातील ३७ देशांचे अधिकारी व मंत्री उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान या बैठकीच्या तयारीसाठी केंद्र सरकारचे अधिकारी येत्या ९ मे रोजी पुणे शहरात येत असून, ११ तारखेपर्यंत ते बैठकीच्या अनुषंगाचे तयारी करण्यासाठी जागा निश्चिती, कार्यक्रमांची रूपरेषा आदी नियोजन महापालिकेच्या सहकार्याने करणार आहेत. जी- २० च्या दुसऱ्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील संबंधित भागांचे सुशोभिकरणही करण्यात येणार असून, यासाठी राज्य शासनाकडून तसेच सीएसआरच्या माध्यमातून निधी उभारण्यात येणार आहे. अशी माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली.