पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडे एकट्या अभियांत्रिकी विद्याशाखेच्या तब्बल ७५ हजार विद्यार्थ्यांनी छायांकित प्रत व पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केले आहेत. मात्र, महाविद्यालयांकडून परीक्षा विभागाकडे विद्यार्थ्यांचे अर्ज पाठविण्यास उशीर झाल्याने पुनर्मूल्यांकनाचा निकाल लावण्यास आणखी एक महिन्याचा कालावधी लागणार आहे.विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने अभियांत्रिकीचा निकाल जाहीर करण्याची घाई केली. मात्र, विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्काचे गुण न दिल्याने अनेक विद्यार्थी नापास झाले. विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष धोक्यात आले. परिणामी विद्यार्थी, पालक व विविध विद्यार्थी संघटनांनी याबाबत आंदोलन केल्यानंतर विद्यापीठाला जाग आली. विद्यापीठातर्फे निकालातील त्रुटींची तपासण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली. या समितीने दिलेल्या अहवालानुसार निकाल जाहीर केल्यामुळे सुमारे ३ हजार विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मात्र, आता पुनर्मूल्यांकनाचे निकाल लागण्यास विलंब होणार असल्याने विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.अभियांत्रिकीच्या प्रथम वर्षाच्या २८ हजार विद्यार्थ्यांनी, द्वितीय वर्षाच्या १७ हजार आणि अंतिम वर्षाच्या सुमारे २५ ते ३0 हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा विभागाकडे छायांकित प्रत व पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केले आहेत. परीक्षा विभागातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र, पात्र अर्ज आणि उपलब्ध मनुष्यबळाचा विचार करता पुनर्मूल्यांकनाचा निकाल जाहीर करण्यास महिन्याचा कालावधी लागणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. परंतु, पुढील अभ्यासक्रमास प्रवेश घेता यावा यासाठी लवकर निकाल जाहीर करावा, अशी मागणी होत आहे.
पुनर्मूल्यांकनाचा निकाल उशिरा
By admin | Published: August 11, 2016 3:05 AM