पुणे: राज्याच्या आरोग्य विभागाच्या वतीने २४ ऑक्टोबरला परीक्षा घेण्यात आली होती. मात्र, यात शेकडो विद्यार्थ्यांना चुकीच्या प्रश्नपत्रिका देण्यात आल्या होत्या. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेण्याचे आरोग्य विभागाने जाहीर केले होते. त्यानुसार २८ नोव्हेंबरला ही फेरपरीक्षा होणार आहे. या विद्यार्थ्यांची पुणे, नाशिक, लातूर आणि अकोला या जिल्ह्यांत परीक्षा होणार आहे, असे राज्याच्या आरोग्य विभागाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत गट ‘क’मधील १२ संवर्गाच्या ५८९ उमेदवारांची नावे फेरपरीक्षेसाठी निश्चित केली आहेत. त्या विद्यार्थ्यांची नावे www.arogyabharti2021.in व arogya.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहेत.
सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत गट-‘क’ संवर्गातील पदे भरण्यासाठी न्यास कम्युनिकेशन यांच्यामार्फत २४ ऑक्टोबरला लेखी परीक्षा घेण्यात आली होती. मात्र, या परीक्षेदरम्यान काही उमेदवारांना चुकीची प्रश्नपत्रिका दिल्याचे निदर्शनास आल्यामुळे मे. न्यास यांना उमेदवारांनी देलेला परीक्षेचा संवर्ग नमुना प्रश्नपत्रिका क्रमांकानुसार चुकीची प्रश्नपत्रिका प्राप्त झालेल्या उमेदवारांची यादी करण्याचे कळविण्यात आले होते. त्यानुसार मे. न्यास यांनी खालीलप्रमाणे ११ संवर्गाच्या ५७५ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या उमेदवारांची फेरपरीक्षा २८ नोव्हेंबर रोजी घेण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांच्या आर्थिक आणि मानसिक त्रासाला जबाबदार कोण, न्यासा कंपनीच्या ढिसाळ नियोजनामुळे एकच परीक्षा आरोग्य विभाग तीन वेळा घेत आहे. त्यामुळे विध्यार्थ्यांना मानसिक त्रास तर होणारच आहे, यासोबतच आर्थिक भुर्दंडही सोसावा लागणार आहे. आरोग्य विभागाने विद्यार्थ्यांना वाहनभाडे द्यावे.
- महेश घरबुडे, एमपीएससी समन्वय समिती.