मार्गासनी :तब्बल एक महिन्याच्या विश्रांतीनंतर वेल्हे तालुक्यात पुन्हा एकदा कोरोनाचा शिरकाव झाला आहे. दोन दिवसांत चार रुग्ण सापडले असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॅा. अंबादास देवकर यांनी दिली.
डॅा. देवकर म्हणाले की वेल्हे ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी दि. ६ जानेवारी रोजी ३ व दि. ७ जानेवारीला १ असे एकूण चार रुग्ण सापडले आहेत. तर आतापर्यत ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी व इतर एकूण १५० जणांची तपासणी करण्यात आली आहे. वेल्ह्यात नोव्हेंबर महिन्यात एकूण २९ रुग्ण कोरोनाचे सापडले होते. त्यानंतर डिसेंबर महिन्यात तालुक्यात एकही कोरोनाचा रुग्ण सापडला नव्हता. तालुका कोरोनामुक्त झाला असे जाहीर करण्यात आले होते. परंतु नवीन वर्षात मात्र तालुक्यात पुन्हा कोरोनाने शिरकाव केला असून, तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय वेल्हे येथील चार कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. हे कर्मचारी पुणे शहरात वास्तव्यास असून दररोज वेल्हे ते पुणे प्रवास करीत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा कोरोनाचा शिरकाव वेल्हे तालुक्यात झाला आहे.
वेल्हे तालुक्यातील ४६५६ जणांची कोरोनाची तपासणी करण्यात आली होती. यामध्ये ६५६ जण कोरोना पॉझिटिव्ह आले होते. आज पुन्हा
एकदा यामध्ये चार रुग्णांची भर पडली असून ६६० रुग्ण झाले आहेत. त्यापैकी २१ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. चार रुग्ण सापडल्याने पुन्हा एकदा प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात गुंतले आहे.