लोकमत न्यूज नेटवर्क
राजगुरुनगर : बागायती क्षेत्र वाचवणे, शेतकऱ्यांना मदत करणे ही राज्य सरकारची भूमिका आहे. त्या अनुषंगाने खेड तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन कमीत कमी बागायती क्षेत्र संपादित होईल, यादृष्टीने येथील जमिनींचे फेर सर्वेक्षण करावे, असे आदेश महाराष्ट्र राज्याचे नगरविकास व बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक राधेश्याम मोपलवार यांना दिले.
शिवसेना उपनेते, शिरूर लोकसभेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या मागणीवरून खेड तालुक्यातील रिंगरोडबाधित शेतकऱ्यांबरोबर एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे वरिष्ठ अधिकाऱ्यांसह शेतकरी शिष्टमंडळाशी संवाद साधला. या वेळी आढळराव पाटील यांनी सांगितले की, खेड तालुक्यातील प्रामुख्याने १२ गावांतून प्रस्तावित रिंगरोड जात आहे. यातील कुरुळी, मोई, निघोजे, चिंबळी, केळगाव, आळंदी, धानोरे, मरकळ, सोळू आदी गावांतील बागायती क्षेत्र मोठ्या प्रमाणात बाधित होत आहे. यापूर्वी मोजणी होऊन प्रस्तावित केलेल्या रिंगरोडमध्ये बड्या मंडळींच्या तसेच डोंगराळ क्षेत्रातील जास्त जागा संपादित होणार होत्या. मात्र, नव्याने प्रस्तावित केलेल्या रिंगरोडमध्ये शेतकऱ्यांच्या बागायती जमिनींचे जास्त प्रमाणात संपादन होणार आहे. त्यामुळे येथील शेतकरी त्रस्त झाले असून, त्यांनी रिंगरोडबाधित कृती समितीची स्थापना केली असल्याची माहिती या बैठकीत दिली. या वेळी उपस्थित शेतकरी शिष्टमंडळातील काही शेतकऱ्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. रिंगरोडचे सर्वेक्षण अतिशय चुकीचे होऊन जास्तीत जास्त बागायती क्षेत्र संपादित होत आहे. आजूबाजूला डोंगर जमीन असताना त्यांचे संपादन जाणीवपूर्वक टाळण्यात आले आहे. या रिंगरोडमध्ये मोठ्या संख्येने प्रत्येक गावातील शेतकरी भूमिहीन होत असून, अनेक शेतकरी अल्पभूधारक होत आहे. यांसह विविध कारणांमुळे या प्रकल्पाला शेतकऱ्यांचा विरोध असल्याची भावना या वेळी बाधित शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
या वेळी शिंदे यांनी कमीत कमी बागायती क्षेत्राचे संपादन होऊन येथील शेतकऱ्यांना न्याय मिळेल यादृष्टीने माजी खासदार आढळराव पाटील व बाधित शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन प्रत्यक्ष गावांमध्ये भेटी द्याव्यात. तसेच शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन येथील भागाची अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता यांच्या उपस्थितीत फेरतपासणी करावी, अशा स्वरूपाचे निर्देश एमएसआरडीसीचे कार्यकारी संचालक राधेश्याम मोपलवार यांना दिले. या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये शिवसेना उपनेते, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, एमएसआरडीसीचे कार्यकारी संचालक राधेश्याम मोपलवार, स्व. आमदार सुरेशभाऊ गोरे प्रतिष्ठानचे अध्यक्ष नितीन गोरे, मोईचे माजी उपसरपंच किरण गवारे, केळगावचे ग्रा. पं. सदस्य किरण मुंगसे, सोळूचे सरपंच पंडित गोडसे, मरकळचे प्रसाद घेनंद, गोलेगावचे हरिभाऊ खांदवे, आळंदीचे सचिन येळवंडे, रवींद्र कुऱ्हाडे, चाकणचे शहरसंघटक पांडुरंग गोरे आदी उपस्थित होते.
फोटो ओळ : खेड तालुक्यातील रिंगरोडबाधित शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत एकनाथ शिंदे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे अधिकाऱ्यांसह शेतकरी शिष्टमंडळाशी संवाद साधला.