पुणे : भारतीय प्रशासकीय सेवापूर्व प्रशिक्षण केंद्र (सीआयएसी) मधील परीक्षा पूर्व प्रशिक्षणासाठी घेण्यात येणारी प्रवेश परीक्षा ऑनलाइन शनिवारी घेण्यात आली. मात्र परीक्षेत झालेल्या तांत्रिक बिघाडीमुळे विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी दोन तासांऐवजी चार तास लागल्याने चांगलाच मन:स्थाप सहन करावा लागला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा यंदा ऑनलाईन घेण्यात आली. वेळापत्रका नुसार शनिवारी सकाळी ११ ते १ या वेळेत सुरू होणार होती. तशी ती परीक्षा सुरू ही झाली . मात्र अचानक ( एरर) तांत्रिक अडचण निर्माण झाली. त्यामध्ये परीक्षेचा बराच वेळ वाया गेला. त्या वेळेत परीक्षा देता येणं शक्य झाले नाही. त्यामुळे पुन्हा वेळ वाढवून देण्यात आला असल्याचा मेसेज विद्यार्थ्यांना परीक्षा विभागाने पाठविला. त्यानुसार २ वाजता परीक्षेसाठी लॉगीन केले. परीक्षा सुरू झाली मात्र काही वेळातच पुन्हा एरर येण्यास सुरूवात झाली. त्यामुळे प्रश्न सोडवताना अडचणी येत होत्या. अखेर वेळ संपला तरी संपूर्ण पेपर सोडवणे शक्य झाले नाही. त्यामुळे सकाळी सुरू झालेली परीक्षा दिवभर तांत्रिक अडचणीत सापडली होती. असे विद्यार्थ्यांनी लोकमतला सांगितले.
तांत्रिक अडचणीमुळे बऱ्याच उमेदवारांना या ऑनलाईन परीक्षेला मुकावे लागले आहे. काही जणांनी परीक्षा दिली काहीजणांना परीक्षा देत असताना प्रश्नांमध्ये अडचणी आल्या काहीची प्रक्रिया चालू झाली नाही. त्यामुळे ऑनलाईन पद्धतीने झालेली परीक्षा रद्द करून पुन्हा घेण्यात यावी. अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.
परीक्षेचा निकाल २८ मार्चला
यूपीएससी-नागरी सेवा परीक्षा २०२१च्या पूर्व तयारीसाठी परीक्षापूर्व प्रशिक्षणासाठी ऑनलाइन परीक्षा राज्यात औरंगाबादसह मुंबई, नागपूर, कोल्हापूर, नाशिक व अमरावती ही प्रशिक्षण केंद्र होती. पदवी, पदवीच्या अंतिम वर्षाला प्रवेशित विद्यार्थ्यांना परीक्षा देता येते. केंद्रात पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीही दिली जाते. या परीक्षेचा निकाल २८ मार्चला लागणार आहे.
परीक्षेतील ऑनलाईन गोंधळ - कॉमन एन्ट्रन्स टेस्टला एंटर केल्यावर त्यामध्ये एरर दाखवत होते. - पुढील प्रोसेस सुरू झाली नाही.त्यानंतर अर्ध्या तासाने संकेतस्थळ सुरू झाले. परंतु कॅमेरासाठी परवानगी मागितली तर एरर आले. - २१ मार्च रोजी राज्यसेवा पूर्व परीक्षा असल्याकारणाने उमेदवारांनी दोन वेळा याबाबत प्रयत्न केला पण सतत तांत्रिक अडचणी आल्याने उमेदवारांना या परीक्षेपासून मुकावे लागले. - पुन्हा २ वाजता लॉगिन केल्यावर प्रक्रिया सुरू झाली व परीक्षा सुरू झाली, मात्र कॅमेरा सुरू झालाच नाही. - सतत एरर दखवत दाखवत होते.