---------------------------------------------------------
जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला भारत हा देश आहे. त्यामुळे जगातील लॉकडाऊनची तुलना भारताबरोबर होऊ शकत नाही. सर्वांना कामाची आवश्यकता आहे. व्यवसाय, अर्थचक्र रोजीरोटी चालली पाहिजे. त्याचबरोबर कोरोनाशी मुकाबला करता आला पाहिजे. यासाठी २४ तास सर्व उपक्रम, पब्लिक ट्रान्सपोर्टसहित चालू ठेवल्यास गर्दी राहणार नाही. कोणालाही कोणत्याही वेळेस गर्दी न करता फिजिकल डिस्टन्सचे पालन करत काम करता येईल. व्यवसाय करता येईल. यासाठी सर्वांना थोडे जास्त कष्ट करावे लागतील. असे झाल्यास अर्थचक्र चालू राहील आणि कोरोनाशी मुकाबलाही करता येईल. संबंधितांनी याचाही विचार करावा. - दादा गुजर, व्यावसायिक
------------------------------------------------------------------------------------------------------
लॉकडाऊनबाबत सरकारलाच निर्णय करता येत नाहीये. वैद्यकीय क्षेत्रालाही कोरोनाबद्दल नीट सांगता येत नाही. कोरोनाचा मुकाबला कसा करायचा याचा फॉर्म्युला कोणत्याच देशाला सापडलेला दिसत नाही. सरकारची जशी ओढाताण होत आहे तशीच निर्णय घेताना नागरिकांची देखील ओढाताण होत आहे. मात्र याचा विचार केला जात नाही. नुसतंच सरकार नागरिकांना पथ्य पाळत नाही म्हणत आहे. पण मुळातच कोरोनावर अजूनही गुणकारी औषध सापडलेले नाही. फक्त लस आपण शोधली आहे. पण नव संकट आलय की कोरोनाचं रूप बदलत आहे. नागरिकांच्या सहकार्याची अपेक्षा असेल तर सर्व बाजू नागरिकांंना व्यवस्थित समजून सांगितल्या पाहिजेत. यातच इतके संकट आले असूनही, राजकारणी एकमेकांना दूषणे देत आहेत याचं दु:ख वाटते. कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी जनतेची मानसिकता तयारी केली पाहिजे. सरकार आणि शास्त्रज्ञांनी आपल्या मर्यादा सांगितल्या पाहिजेत. - डॉ. बाबा आढाव, ज्येष्ठ कामगार नेते