भोसरी : भावाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी पती आणि त्याच्या मित्राच्या मदतीने तरुणाचे अपहरण करून खून केल्यानंतर मृतदेह जंगलामध्ये टाकून देण्यात आल्याचे प्रकरण उघडकीस आणण्यात गुन्हे शाखेच्या दरोडा प्रतिबंधक पथकाला यश आले आहे. सुमारे आठ महिन्यांपूर्वी झालेला हा खून जवळपास ‘पचलेला’ असतानाच पोलिसांनी गुन्ह्याला वाचा फोडली. अटक करण्यात आलेल्यांमध्ये माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश शेट्टी यांच्या खून प्रकरणातील संशयित आरोपीचाही समावेश असल्याची माहिती उपायुक्त पी. आर. पाटील यांनी दिली. आकाश श्रीधर मगर (वय २३) असे खून झालेल्याचे नाव आहे. सीमा आकाश खराडे (वय २६), तिचा पती आकाश ऊर्फ आक्या नवनाथ खराडे (वय २६) आणि सुनील ऊर्फ डोंगऱ्या हनुमंता राठोड (वय ३०) यांना अटक केली आहे. डोंगऱ्या हा सतीश शेट्टी खून प्रकरणातील आरोपी आहे. आकाश मगर २८ जुलै २०१५ रोजी बेपत्ता झाला होता. मगर याने त्याच्या ६ साथीदारांसह मिळून सीमाचा भाऊ राजेश राजू जाधव (रा. पिंपरी) याचा ३० आॅक्टोबर २०१४ रोजी खून केला होता. मगर येरवडा कारागृहात गेला. तेथे त्याची आकाश खराडे याच्यासोबत ओळख झाली. मगर सीमाला त्रास देत होता. त्यामुळे तिने पती खराडेला राजेशच्या खुनाचा बदला घ्यायला प्रवृत्त केले. आठ महिन्यांनंतर गुन्हा उघडकीस आला. (वार्ताहर)
आठ महिन्यांपूर्वीच्या गुन्ह्याला फुटली वाचा
By admin | Published: March 27, 2016 2:48 AM