लोणी काळभोर : रागाच्या भरात आरोपीने दिलेल्या कबुलीने तब्बल पाच वर्षापूर्र्वी पाणी भरण्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या एका खुनाचा गुन्हा उघडकीस आला़ याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांना तिघांना अटक केली आहे़ तर दोन आरोपी फरारी आहेत. अजित रावसाहेब सावंत, शांताबाई रावसाहेब सावंत व राजू त्रिंबक चव्हाण अशी अटक केलेल्यांची नावे आहेत़ बेबीताई विलास मकवाने व गंगूबाई पवार या दोघी फरारी झाल्या आहेत. लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभिमान पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार हिराबाई उत्तम चव्हाण (वय ५०, रा. गांधनखिळा, फुरसुंगी, ता. हवेली) यांचा खून झाला असून ही घटना १० एप्रिल २०१० रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडली होती. या संदर्भात विजय उत्तम चव्हाण (वय. २२, रा. गांधणखिळा, फुरसुंगी, ता. हवेली, हल्ली मुक्काम जाधव वस्ती, थेऊर, ता. हवेली ) यांनी हरविल्याची तक्रार दिली होती़ विजय व त्यांचा भाऊ संजय चव्हाण हे गवंडी काम करतात. गांधणखिळा येथे या दोघांसह संजयची पत्नी, विजयची पत्नी, मुले व आई हिराबाई असे सर्व जण राहत होते. पाच वर्षापूर्वी मांढरदेवी काळूबाईचे दर्शन घेऊन आल्यानंतर विजय एका नातेवाईकाबरोबर गवंडी काम करण्यासाठी मुंढवा येथे गेला होता. १२ दिवसांनी परत आल्यावर त्याला आई दिसली नाही म्हणून त्याने चौकशी केली, परंतू आई सापडली नाही. म्हणून त्याने २५ एप्रिल २०१० रोजी लोणी काळभोर पोलिसांकडे आई हरविल्याची तक्रार दाखल केली होती. परंतू तब्बल पाच वर्षे हिराबाईचा तपास लागला नाही. विजयचा भाऊ संजय हा २ मे २०१५ रोजी कवडी गांव येथे काम करत असताना पाच वर्षापूर्वी त्यांच्या शेजारी राहणारा अजित सावंत भेटला. एकमेकांकडे पाहण्यावरुन त्यांच्यात तेव्हा वाद झाला़ तेव्हा तो रागाच्या भरात संजयला म्हणाला की पाच वर्षापूर्र्वी जसे तुझ्या आईला फाशी देऊन मारले, तसेच तुला सुद्धा मारेन. ही हकिकत संजयने विजयला सांगितली़ त्यावर विजयने लोणी काळभोर पोलिसांशी संपर्क साधला. लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभिमान पवार यांनी या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक रणजीतसिंग परदेशी, हवालदार दत्तात्रय गिरमकर, गणेश पोटे, बाळासाहेब चोरामले, स्वप्नील अहिवळे, रामदास जगताप यांच्या कडे सोपविला. या पथकाने अजित सावंत याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता ५ वर्षापूर्वी घडलेला खुनाचा प्रकार उघडकीस आला. (वार्ताहर)बेवारस म्हणून अत्यंसंस्कारहिराबाई यांचा मृतदेह कॅनॉलमधून वाहत वाहत सोरतापवाडी येथे गेला़ १२ एप्रिलला तो सापडला़ पोलिसांनी तो ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला़ मात्र, तोपर्यंत हिराबाई हरविल्याची तक्रार नसल्याने या मृतदेहाची ओळख पटू शकली नाही़ बेवारस म्हणून त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले़
रागामुळे ५ वर्षांनतर फुटली महिलेच्या खुनाला वाचा
By admin | Published: May 07, 2015 4:58 AM