प्रज्ञा केळकर-सिंग- पुणे : अपघातामुळे ‘ती’ला अपंगत्व आले. पाच वर्षांच्या सक्तीच्या विश्रांतीशी आणि शारीरिक व्याधीशी झगडताना रिकाम्या वेळेत काय करायचे, या विचाराने ‘ती’ला कमालीचे नैैराश्य यायचे. गावात वाचनालय असते तर पुस्तके वाचून वेळ सत्कारणी लागला असता, असे ‘ति’ला वाटले. हा विचार प्रत्यक्षात उतरवत अमरावतीच्या राजश्री पाटील या तरुणीने जेमतेम सात हजार लोकसंख्येच्या तीन गावांसाठी वाचनालय सुरू करण्याचा निर्धार केला. या निर्धाराला पुणेकरांनी पुस्तके दान करीत साथ दिली. येत्या २७ फेब्रुवारीला म्हणजेच ‘मराठी राज्यभाषा दिनी’ या वाचनालयाचा श्रीगणेशा करण्याचा राजश्रीचा मानस आहे.अचलपूर तालुक्यातील (जि. अमरावती) चमक बुद्रुक राजश्री पाटीलचे गाव. मज्जारज्जूला झालेल्या दुखापतीमुळे ‘व्हीलचेअर’ला खिळलेली राजश्री सकारात्मकपणे स्वत:च्या पायावर उभी आहे. तिच्या गावाला लागूनच चमक (खुर्द) आणि सुरवडे ही दोन गावे आहेत. साधारण प्रत्येकी दोन हजारच्या आसपास लोकसंख्या असलेल्या या तिन्ही गावात वाचनालय नाही. तिथल्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी तिने प्रदीप लोखंडे यांच्या सहकार्याने ‘ग्यान-की’ वाचनालय सुरू केले आहे. पंचक्रोशीतील तरुण, प्रौढ आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी वाचनालय असावे, यासाठी तिने सुधा मूर्तींशीही संपर्क साधला. गेल्या आठवड्यात स्वागत थोरात यांच्याशी राजश्रीने संपर्क साधला. स. प. महाविद्यालयातील ‘दिव्यझेप’ ग्रुपच्या प्रमुख योगिता काळे व काही विद्यार्थ्यांशी चर्चा करून थोरात यांनी मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेतील सुमारे ५०० पुस्तकांचे संकलन केले आहे. ही पुस्तके येत्या आठ दिवसांत राजश्रीच्या गावी रवाना केली जात आहेत. या प्रकल्पासाठी पुणे, मुंबईतील अनेक पुस्तकप्रेमींना आवाहन करण्यात आले आहे.........आमच्या तिन्ही गावांत एकही वाचनालय नाही. मला पुस्तके मिळाली असती, तर कदाचित नैैराश्याचा सामना आणखी समर्थपणे करू शकले असते. पुस्तके जगण्याचे बळ देतात. हेच बळ गावातल्या सर्वांना मिळावे, यासाठी वाचनालय सुरू करण्याचे ठरवले. त्यासाठी स. प. महाविद्यालयातील विद्यार्थी आणि स्वागत थोरात यांनी मदतीचा हात दिला. माझे कुटुंबीय माझ्यामागे ठामपणे उभे आहेत. येत्या मराठी भाषादिनी ग्रामपंचायत कार्यालयात छोटेखानी वाचनालयाचे उद्घाटन होईल आणि पुस्तकांचा खजिना गावकºयांसाठी खुला होईल. - राजश्री पाटील, अमरावती
फावल्या वेळेसाठी ‘ती’चा वाचनसंस्कृतीचा वसा!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2020 11:53 AM
येत्या २७ फेब्रुवारीला म्हणजेच ‘मराठी राज्यभाषा दिनी’ या वाचनालयाचा श्रीगणेशा
ठळक मुद्दे अपंगत्व आल्याने सामाजिक कामासाठी पुढाकार