राज्य शासनाने स्वयंसेवी संस्थांबरोबर २०१८ मध्ये करार करून राज्यातील ६५ हजार शाळांमध्ये ‘रीड टू मी’ या सॉफ्टवेअरचा ॲक्सेस देण्याचे निश्चित केले. परंतु, हे सॉफ्टवेअर कार्यान्वित करण्यासाठी बहुतांश शाळांमधील संगणक सक्षम नसल्याचे आढळून आले. त्यामुळे या सॉफ्टवेअरचा ॲक्सेस शाळांमध्ये देणे शक्य झाले नाही. पुणे जिल्ह्यात १ हजार ९०२ शाळांमध्ये सॉफ्टवेअरचा ॲक्सेस दिल्याचे शासनाच्या अहवालात नमूद आहे. परंतु, सध्या सुमारे ४२५ शाळांमध्येच हे सॉफ्टवेअर सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
राज्य शासनाने केलेल्या करारानुसार नोव्हेंबर २०२१ पर्यंत ‘रीड टू मी’ हे सॉफ्टवेअर शाळेतील संगणकाद्वारे मोफत वापरता येणार होते. परंतु, कोरोनामुळे या सॉफ्टवेअरचा ॲक्सेस शाळांना देता आला नाही. तसेच कोरोनामुळे सध्या विद्यार्थ्यांना शाळेत येणे शक्य होत नाहीत. त्यामुळे शाळांमध्ये सॉफ्टवेअर देऊन उपयोग होणार नाही. ही बाब विचारात घेऊन स्वयंसेवी संस्थांनी राज्य शैक्षणिक, संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या माध्यमातून नवा करार करून हेच सॉफ्टवेअर मोबाईल ‘ॲप’च्या स्वरूपात देण्याबाबत पुढाकार घेतला आहे.
--------------------
इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या अँड्रॉइड मोबाईलच्या माध्यमातून ‘रीड टू मी’चा वापर करून इंग्रजी वाचन कौशल्य व आकलन करणे शक्य होणार आहे. शिक्षण विभागाकडून या स्वयंसेवी संस्थांबरोबर तीन वर्षांचा करार केला जाणार आहे. त्यामुळे पुढील तीन वर्ष सर्व विद्यार्थ्यांना हे ॲप मोफत वापरता येणार आहे, असे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
--------