पुणे : सोमवार पेठेतील कोटक बँकेच्या एटीएममध्ये छेडछाड करून खातेदारांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. हडपसर येथे राहणाऱ्या विशाल प्रमोद गवळी यांनी पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनुसार, हा प्रकार २५ मे २०२३ रोजी संध्याकाळी ७.१० ते ८.४० यादरम्यान घडला आहे.
फिर्यादीत म्हटल्यानुसार, गवळी हे पैसे काढण्यासाठी कोटक बँकेच्या एटीएममध्ये गेले होते. सगळा तपशील टाकून झाल्यावर एटीएममधून १० हजार रुपये नगद कलेक्ट करा असा मेसेज दर्शवला. गवळी यांनी काही वेळ वाट पहिली मात्र कॅश आलीच नाही त्यामुळे एटीएममध्ये पैसे संपले असावेत आणि बँकेत पुन्हा जमा झाले असावेत असा विचार करून गवळी माघारी परतले. मात्र बँकेत पैसे जमा झालेच नाही आणि गवळी यांनाही मिळाले नाहीत. सीसीटीव्ही तपासून पहिले असता दोन अज्ञातांनी शटर टेम्परिंग करून फसवणूक केल्याचे लक्षात आले. बँकेची आणि खातेधारकाची फसवणूक केल्याप्रकरणी दोघा अज्ञातांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस उपनिरीक्षक रणदिवे पुढील तपास करत आहेत.
‘शटर टेम्परिंग’ म्हणजे काय?
एटीएममधून पैसे बाहेर येतात त्याच ठिकाणी पट्टी लावली जाते. एटीएम मधून पैसे आले की ते तिथेच अडकून राहतात आणि ग्राहकाला मिळत नाहीत. पैसे आले नाही म्हणजे रिफंड होतील असे ग्राहकाला वाटते. आणि ग्राहक तेथून निघून गेल्यावर आरोपी ती पट्टी काढून पैसे काढून घेतात.