- विश्वास मोरे, पिंपरी वाचाल तर वाचाल, असे आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांनी म्हटले आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिका शाळांतील मुलांना वाचणाची आवड निर्माण करण्याचा उपक्रम शिक्षण मंडळाने सुरू केला आहे. ५० शाळांमध्ये शिक्षण मंडळ आणि रूम टू रिड इंडिया या सेवाभावी संस्थेच्या वतीने ग्रंथालय सुरू करण्यात येणार आहे. वाचनसंस्कृती वाढविणारा पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील पहिलाच उपक्रम आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरात १३१ प्राथमिक शाळा आणि १९ माध्यमिक विद्यालये आहेत. महापालिकेच्या शाळांत सुमारे पन्नास हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मुलांच्या सर्वांगिण विकासासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात. त्यापैकी वाचनसंस्कृती वाढविण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. महापालिका शाळामधील मुलांना वाचनाची आवड निर्माण व्हावी, म्हणून शिक्षण मंडळाच्या वतीने रूम टू रिड हा उपक्रम राबविण्याची संकल्पना गतवर्षी तत्कालीन सभापती चेतन घुले, संचालक सौरभ बॅनर्जी, प्रशासन अधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर यांनी मांडली. आता ही संकल्पना पूर्णत्वास आली आहे. रूम टू रिड इंडिया या सेवाभावी संस्थेच्या सहकार्याने पिंपरी-चिंचवड परिसरातील पन्नास शाळांमध्ये ग्रंथालय उभारले आहे. हे ग्रंथालय आधुनिकतेची कास धरणारे आहे. शाळांमध्ये ग्रंथालयाच्या धर्तीवर विभागाची सजावट केली आहे. तिथे तीन बुक शेल्फ, चार रीडिंग टेबल, दोन कार्पेट, दोन डिस्प्ले उपलब्ध करून दिले आहेत. एका ग्रंथालयात आठशे ते हजार पुस्तके उपलब्ध असणार आहेत.याविषयी सभापती निवृत्ती शिंदे व उपसभापती विष्णू नेवाळे म्हणाले, ‘‘आजचे बालक उद्याचे आशास्थान आहेत. वाचन संस्कार झाल्याने मुले अधिक प्रगल्भ होऊ शकतात. या उपक्रमाचा सर्व खर्च सेवाभावी संस्था करणार आहे. त्यासाठी शिक्षण मंडळाच्या वतीने संबंधित संस्थेस जागा उपलब्ध करून दिली आहे. चिंचवड, दिघी, भोसरी, पिंपळे गुरव आदी शाळांमध्ये वाचनालय सुरू झाले आहे.’’मुलांमध्ये अभ्यासाची गोडी, वाचनाची आवड निर्माण व्हावी, याकरिता आम्ही तीन वर्षांचा ग्रंथालय प्रकल्प संपूर्ण देशात राबवीत आहोत. हा प्रकल्प देशातील दिल्ली, राजस्थान, छत्तीसगड, उत्तराखंड, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश आणि तेलंगणा राज्यात राबविला जात आहे. एकूण ४२६ शाळांमध्ये हा उपक्रम राबविला जात आहे. ग्रंथालयात जाऊन मुलांच्या मनात व शिक्षकांच्या अध्यापनात ग्रंथप्रेम ओतप्रोत भरले जावे, यासाठी अनेक चरित्रे, इतिहास, आदर्श त्यांच्यापुढे उभे राहावे, यासाठी ही चळवळ आहे, असे बॅनर्जी यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांना वाचनसंस्कृतीचे धडे
By admin | Published: January 22, 2017 4:47 AM